राजकीय

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

सांगोला तालुक्यातील सात रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून मंजुरी

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

सांगोला तालुक्यातील सात रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून मंजुरी

सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत राज्य शासनाने तालुक्यातील सात रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे या रस्त्यांच्या दर्जोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून, एकूण १४.५० किलोमीटर लांबीचे रस्ते ग्रामीण मार्ग योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. या मंजुरीसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता.या निर्णयानुसार पुढील सात रस्त्यांचा ग्रामीण मार्गामध्ये समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग (NH-965) मेथवडे फाटा (कॅनॉलपुल) ते प्रजिमा-163 ला जोडणारा रस्ता – २.०० कि.मी.

संगेवाडी ते मेथवडे रस्ता – २.६० कि.मी.

संगेवाडी ते रोटफळ रस्ता – २.०० कि.मी.

प्रजिमा-163 (तुळशीराम पवार ते पाटील गणपत्ये वस्ती) – संगेवाडी–मेथवडे रस्ता – २.०० कि.मी.

प्रजिमा-78 ते प्रजिमा-79 (वाटंबरे–अकोला रस्ता) ला जोडणारा रस्ता – २.५० कि.मी.

मेडशिंगी हुलगेवाडी डांबरीकरण रस्त्यापासून लेंडवे चिंचोळे शिवारापर्यंत जाणारा रस्ता – १.४० कि.मी.

एखतपूर गावठाण ते डी.एड. कॉलेज रस्ता – २.०० कि.मी.

या मंजुरीमुळे सांगोला तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क अधिक सुकर होणार असून, शेतकरी, विद्यार्थी, नागरिक तसेच दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार परिणामी रस्ते विकास योजना २००९-२१ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण मार्गांची एकूण लांबी ६६५७.२३ कि.मी. वरून ६६७१.७३ कि.मी. इतकी झाली असून, त्यामध्ये १४.५० कि.मी.ची वाढ झाली आहे.याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, “सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, हा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या सात रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळवून देण्यात यश आले. पुढील टप्प्यात या रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार कामे पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न सुरू राहतील.”या निर्णयामुळे सांगोला तालुक्याच्या ग्रामीण विकासाला नवी चालना मिळणार असून, भविष्यात या रस्त्यांच्या उन्नतीकरणामुळे वाहतूक, शेतीमालाची ने-आण आणि गावांमधील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सदरच्या ग्रामीण मार्गाचा दर्जा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!