पिस्तूलाचा धाक दाखवत डाळिंब व्यापाऱ्याला लुटले; सांगोल्यात चोरट्यांचा थरार!
विना नंबरच्या काळ्या स्कार्पिओतून आलेल्या टोळीचा धुमाकूळ; पाठलागात एक जण जखमी, पाच संशयित पसार ४० हजार रुपयांची रोकड व साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना

पिस्तूलाचा धाक दाखवत डाळिंब व्यापाऱ्याला लुटले; सांगोल्यात चोरट्यांचा थरार!
विना नंबरच्या काळ्या स्कार्पिओतून आलेल्या टोळीचा धुमाकूळ; पाठलागात एक जण जखमी, पाच संशयित पसार
४० हजार रुपयांची रोकड व साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना
सांगोला (प्रतिनिधी): विना नंबरच्या काळ्या स्कार्पिओमधून आलेल्या सशस्त्र चोरट्यांनी डाळिंब व्यापाऱ्याच्या डोक्याला पिस्तूल लावत ४० हजार रुपयांची रोकड व साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री सांगोल्यातील मित्रनगर परिसरात घडली. घटनेनंतर नागरिकांनी केलेल्या पाठलागामुळे चोरट्यांची स्कार्पिओ शिवाजीनगर परिसरात अडकली. यावेळी पाच संशयितांनी वाहन सोडून भिंतीवरून उड्या मारत पलायन केले; तर एका संशयिताला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
याप्रकरणी सचिन महाकाळ (रा. वासूद, ता. सांगोला) यांनी सांगोला पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वर पांडुरंग गवळी यांच्यासह सहा जणांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे करीत आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,
सचिन महाकाळ (रा. वासूद, ता. सांगोला) हे डाळिंब व्यापारी रात्री साडेआठच्या सुमारास मित्रनगर परिसरातून जात असताना विना नंबरच्या काळ्या स्कार्पिओमधून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी पिस्तूलाचा धाक दाखवत त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावले आणि त्यांच्याकडील सुमारे ४० हजार रुपयांची रोकड तसेच साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
लूट केल्यानंतर चोरटे स्कार्पिओमधून पसार होत असताना नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. वंदे मातरम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वाढेगाव नाका, कडलास नाका, वासूद चौक असा पाठलाग करत नागरिक दत्तनगर व शिवाजीनगर परिसरापर्यंत पोहोचले. शिवाजीनगर परिसरात अचानक स्कार्पिओ थांबताच त्यातील पाच संशयित वाहनातून खाली उतरले आणि भिंतीवरून उड्या मारत अंधाराचा फायदा घेत पसार झाले. मात्र, त्यातील ईश्वर पांडुरंग गवळी याला नागरिकांनी पकडले. झालेल्या मारहाणीत त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. त्याला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्यासह पोलिस पथकाने सांगोला ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमी संशयिताचा जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी चोरट्यांनी वापरलेली विना नंबरची काळी स्कार्पिओ ताब्यात घेतली असून, पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, याच टोळीने मंगळवेढा मार्गावरही अशाच प्रकारे लुटमारीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मरवडे येथील अक्षय जावीर हे आई-वडील व भाच्यासह कडलास येथे नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम आटोपून रात्री आठच्या सुमारास कारने मरवडेच्या दिशेने जात होते. यावेळी विना नंबरच्या स्कार्पिओमधून आलेल्या सात जणांनी त्यांची कार अडवली. अक्षय जावीर खाली उतरल्यानंतर संशयितांनी पिस्तूलातून दोन वेळा गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. अक्षय यांनी धाडसाने प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांच्या खिशातील सुमारे दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांच्या आईच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही काढून घेत संशयितांनी स्कार्पिओमधून सांगोल्याच्या दिशेने वेगाने पलायन केले.
सांगोला शहर व परिसरात काही तासांच्या अंतराने पिस्तूलाचा धाक दाखवून लुटमारीच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही घटनांमध्ये विना नंबरच्या स्कार्पिओचा वापर झाल्याने या घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून मिळणाऱ्या माहितीनुसार पसार झालेल्या साथीदारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनाची माहिती आणि संशयितांच्या हालचालींच्या आधारे तपासाला वेग देण्यात आला आहे. सांगोल्यात सशस्त्र लुटमारीच्या घटनांनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पसार झालेल्या टोळीला पोलिस कधी गजाआड करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



