सांगोला महाविद्यालयात ‘सद्भावना दिवस’ उत्साहात संपन्न

सांगोला महाविद्यालयात ‘सद्भावना दिवस’ उत्साहात संपन्न
सांगोला / प्रतिनिधी: सांगोला महाविद्यालयात गुरुवार, दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी ‘सद्भावना दिवस’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या महत्वपूर्ण दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात सामूहिक सद्भावना शपथ घेण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. सुरेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना देशात राष्ट्रीय एकात्मता, शांतता आणि सलोखा अबाधित राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच सर्वांनी जाती, धर्म आणि भाषेच्या पलीकडे जाऊन देशाच्या प्रगतीसाठी व शांततेसाठी काम करावे असे विचार व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्वांना सामूहिकरीत्या सद्भावना शपथ देण्यात आली.
त्याचे वाचन डॉ. विजयकुमार गाडेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी कार्यालयीन अधिक्षक श्री. विलास माने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन जयंती, पुण्यतिथी उपक्रम आयोजन समितीचे प्रमुख डॉ. जमीर तांबोळी, प्रशासकीय कर्मचारी श्री. भाऊसो गायकवाड व श्री. बापू इंगोले यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



