कृषी सल्ला

सांगोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ! आगलावेवाडी आणि मेडशिंगीत घरफोडी

सांगोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ! आगलावेवाडी आणि मेडशिंगीत घरफोडी

२५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यात बंद घरांना लक्ष्य करून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आगलावेवाडी (जवळा) आणि मेडशिंगी येथे दोन घरफोड्या झाल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये २५ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही घरमालक बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले. त्यामुळे या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगलावेवाडीत यात्रेला गेलेल्या दाम्पत्याचे घर फोडले

आगलावेवाडी, जवळा येथील विठोबा साउबा गवंड (वय ७४) हे पत्नी कमल यांच्यासह राहतात. त्यांचा मुलगा ट्रान्सपोर्ट व्यवसायानिमित्त पुणे येथे वास्तव्यास आहे. गवंड दाम्पत्य ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास यलमार मंगेवाडी येथील मरीआई देवीच्या यात्रेसाठी नातेवाईकांकडे गेले होते. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम कपाटात ठेवून त्यांनी घर बंद केले होते.
रात्र झाल्याने आणि पावसाचे वातावरण असल्याने त्यांनी नातेवाईकांकडेच मुक्काम केला. दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८.४० वाजता गवंड यांना त्यांचा पुतण्या आकाश गवंड याचा फोन आला. घरातील कागदपत्रे कोरडा नदीच्या काठावर पडलेली असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर गवंड यांनी ओळखीचे भारत साळुंखे यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. भारत साळुंखे यांनी घराची पाहणी केली असता घराचे कुलूप तोडलेले आणि कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे आढळले. त्यांनी गवंड यांना फोन करून माहिती दिल्यानंतर गवंड दाम्पत्य घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांनी कपाट तपासले असता सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम गायब असल्याचे आढळून आले. या चोरीत १ लाख ६० हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, १ लाख २० हजार रुपये किमतीची तीन तोळ्यांची सोन्याची चैन, ४० हजार रुपये किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, १ हजार रुपये किमतीचे ४ तोळे वजनाचे चांदीचे ब्रेसलेट आणि ३५ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

मेडशिंगीत कुलूप तोडून सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास

दुसरी घटना मेडशिंगी येथे घडली. दिलीप भिमराव गाडेकर (वय ६५) हे पत्नी व मोठ्या बहिणीसह राहतात. गाडेकर हे शेतीसोबत पेन्शनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते ३ ऑगस्ट रोजी पत्नीसमवेत न्यायालयीन कामानिमित्त मुंबईला गेले होते. घरात असलेली त्यांची बहीण कमल यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्या. घराला कुलूप लावून त्या निघून गेल्या.
त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घराचे मुख्य कुलूप कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडून घरात प्रवेश केल्याचे उघडकीस आले. बेडरूममधील लोखंडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त होते.
गाडेकर हे ८ ऑगस्ट रोजी घरी परतल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे दिसून आले. या घटनेत २ लाख ३६ हजार रुपये किमतीचे ५ तोळे ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १२ हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४० हजार रुपये किमतीची १तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ, ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा लक्ष्मीहार, ४४ हजार रुपये किमतीची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ७२ हजार रुपये किमतीची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व पेंडल, ६८ हजार रुपये किमतीची १७ ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, ३६ हजार रुपये किमतीचा ९ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार आणि ७ हजार रुपये रोख असा एकूण ५ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

आगलावेवाडी आणि मेडशिंगी येथील दोन्ही घटनांमध्ये घरमालक बाहेरगावी गेले असताना चोरी झाली आहे. त्यामुळे बंद घरांची माहिती घेऊन त्यांना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, आगलावेवाडी येथील फिर्यादीने आजूबाजूला चौकशी केली असता मानेगाव येथील नवनाथ रामचंद्र कांबळे यांच्या घरीदेखील चोरी झाल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान

ग्रामीण भागातील नागरिक सण, यात्रा, कौटुंबिक किंवा न्यायालयीन कामानिमित्त काही दिवसांसाठी बाहेर जातात. याच काळात बंद घरांची पाहणी करून चोरटे संधी साधत असल्याची शक्यता आहे. स्था करणे गरजेचे आहे. सांगोला तालुक्यातील या दोन्ही घरफोड्यांचा तपास करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी तातडीने जेरबंद करावे आणि चोरीचा मुद्देमाल परत मिळवावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!