‘समाजासाठी जीव देऊ शकतो; वेळ पडली तर जीव घेण्याची वेळही येऊ शकते!’
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा; वाटंबरेतील सभेत आक्रमक भूमिका, ‘मराठ्यांनो एकजूट राहा’चे आवाहन

‘समाजासाठी जीव देऊ शकतो; वेळ पडली तर जीव घेण्याची वेळही येऊ शकते!’
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा; वाटंबरेतील सभेत आक्रमक भूमिका, ‘मराठ्यांनो एकजूट राहा’चे आवाहन

सांगोला (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची धार अधिक तीव्र करत असलेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मराठवाड्यात कुणबी समाजाच्या प्रमाणपत्रांबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत आपली भूमिका मांडली. “मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो; तशी वेळ पडली तर कोणाचा जीव घेण्याची वेळही येऊ शकते. मला त्या वाटेवर नेऊ नका,” असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचं आणि निर्णायक आंदोलन होणार असल्याची घोषणा केली आहे. या दौऱ्यावेळी सांगोला तालुक्यातील वाटंबरे गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना संबोधित केलं. सांगोल्यात आगमन होताच मराठा समर्थकांनी जेसीबीने फुलांची उधळण करत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केले.
मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून, २९ ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी यापूर्वी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे आयोजित सभेला मोठी गर्दी झाली होती. सांगोल्यात आगमन होताच मराठा समर्थकांनी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केले.
वाटंबरे येथील सभेत मराठा समाजाला संबोधित करताना जरांगे पाटील म्हणाले की, “तुमची लेकरं-बाळं संकटात आहेत. मराठा समाज संकटात सापडला आहे. शिरसाट आणि बावनकुळे यांनी प्रमाणपत्रे रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “मी एकनाथ शिंदे साहेबांना प्रचंड मानणारा माणूस आहे. त्यांनी मराठ्यांच्या नोंदी शोधल्या, समिती गठित केली आणि ५८ लाख नोंदी शोधल्या. मात्र, आज त्यांच्याच मंत्र्याने या नोंदी रद्द करण्याचा घाट घातला,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “एक वर्षभर मी फडणवीस यांच्याबाबत काही बोललो नाही. मात्र, त्यांच्या सांगण्यावरूनच बावनकुळे यांनी मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात केली,” असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांनी आक्रमक इशारा दिला. “बावनकुळे यांना एवढी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. तुमची गाठ आता मराठ्यांशी आहे, हे लक्षात ठेवा. मी बावनकुळे यांच्या मागे लागलो तर खूप अवघड होईल,” असे ते म्हणाले.

मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांबाबत सरकारने फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारमधील नेत्यांवर त्यांनी थेट निशाणा साधला. “ज्याची चूक असेल त्याला मी सोडत नाही. छगन भुजबळ यांच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे,” असे म्हणत जरांगे पाटील यांनी पुढील काळातही आंदोलन अधिक आक्रमक करण्याचे संकेत दिले. “सर्व मराठ्यांनी अगोदर समाज आणि नंतर पक्ष हे लक्षात ठेवावे,” असे आवाहन करत त्यांनी राजकीय पक्षांपेक्षा समाजाच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “मराठ्यांनो, पुढच्या काळात एकजूट राहा. सर्वांची जबाबदारी आहे. वेळीच सावध व्हा. हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जात आहे. समाजापेक्षा मोठे कोणीही नाही,” असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याने २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निर्णायक आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यादरम्यान त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद, सरकारविरोधातील आक्रमक वक्तव्ये आणि मराठा समाजाला केलेले एकजुटीचे आवाहन यामुळे आगामी आंदोलनाची पार्श्वभूमी अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



