सामाजिक

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी माण नदीत दाखल, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी माण नदीत दाखल, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सांगोला (प्रतिनिधी): टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे सांगोल्यासाठी आवर्तन सुरू करण्यात आले असून, टेंभूच्या पाण्याने आटपाडी तलाव भरल्यानंतर आता माण नदीत ते पाणी सोडले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीत सांगोल्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सांगोला तालुक्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू योजनेतून आवर्तन सुरू होण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

टेंभू उपसा सिंचन योजनेतून सोडण्यात आलेले पाणी आज संध्याकाळपर्यंत माण नदीपात्रात पोहोचणार असल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन टेंभू योजनेतून माण नदीला उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडावे अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी २८ एप्रिल रोजी लेखी पत्र देऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. तसेच सांगोल्यात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू योजनेतून लाभक्षेत्रातील जुनोनी, हातीद, पाचेगांव जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून टेंभूचे माण नदीमध्ये पाणी सोडून खवासपूर ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आल्याने अखेर टेंभू योजनेचे पाणी माण नदीत दाखल होत असून, याचा लाभ तालुक्यातील शेतकरी, पशुपालक तसेच नागरिकांना होणार आहे. नदीपात्रातील पाण्यामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीतही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही गावाला पाणी कमी पडू नये, याची दक्षता घेण्याच्याही सूचना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात टेंभूचे पाणी मिळाल्याने पिण्याचा पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने माणनदी नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी माण नदीत सोडण्याची मागणी मान्य केल्याबद्दल जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांचे आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!