सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलावावर ‘हिमालयन एअरलाइन्स’ची धडक
मध्य आशियातून आलेल्या परदेशी राजहंसांचे थवे, पक्षीप्रेमींमध्ये उत्साह

सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलावावर ‘हिमालयन एअरलाइन्स’ची धडक
मध्य आशियातून आलेल्या परदेशी राजहंसांचे थवे, पक्षीप्रेमींमध्ये उत्साह
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलावावर यंदा हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांची विशेष गर्दी पाहायला मिळत असून, जगातील सर्वाधिक उंचीवर उडणारा म्हणून ओळखला जाणारा बार-हेडेड गूज अर्थात परदेशी राजहंस (पट्टकादंब) या दुर्मिळ पक्ष्यांचा पन्नासहून अधिक संख्येचा मोठा थवा येथे दाखल झाल्याने पक्षीप्रेमी, अभ्यासक व छायाचित्रकारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य आशिया, चीन, तिबेट, रशिया व मंगोलिया या बर्फाच्छादित प्रदेशांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे हिवाळी पाहुणे सांगोल्यात दाखल झाले आहेत.

सांगोला तालुक्यातील विविध तलाव, जलाशय, पाणथळीची ठिकाणे व परिसरातील शांत, निसर्गरम्य वातावरण यामुळे हा भाग पक्षी व वन्यजीवांसाठी माहेरघर मानला जातो. यंदा पावसाळा समाधानकारक झाल्याने तलाव, विहिरी व जलाशय पाण्याने भरलेले आहेत. विशेषतः सांगोला-आटपाडी सीमेवरील बुद्धेहाळ तलावामध्ये जलसंधारणाच्या कामांमुळे पाण्याची पातळी उत्तम असून खाद्यसाखळी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी या तलावाला पसंती दिल्याचे पक्षी अभ्यासकांचे मत आहे.

बुद्धेहाळ तलावाचा इतिहासही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ब्रिटिश काळात सन १९०२ मध्ये या तलावाचे बांधकाम सुरू झाले व पुढील कामे १९५७ मध्ये पूर्ण झाली. सांगोला व आटपाडी तालुक्यांना पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने उभारलेला हा तलाव सुमारे ११०० दशलक्ष घनलिटर इतकी विशाल साठवण क्षमता असलेला आहे. परिसरातील पर्वतरांगांमधून येणाऱ्या पाणलोट क्षेत्रामुळे तलाव वर्षभर समृद्ध राहतो. तलावाची तटबंदी, उंच झाडे, शांत वातावरण व ब्रिटिशकालीन बांधकाम असलेला बंगला (गेस्ट हाऊस) यामुळे हा परिसर पक्षी व वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास ठरला आहे.
सध्या येथे दाखल झालेले बार-हेडेड गूज हे जगातील सर्वाधिक उंचीवरून उडणारे पक्षी म्हणून ओळखले जातात. हिमालयाच्या पर्वतरांगांवरून ८००० ते ९००० मीटर उंचीवरून उड्डाण करून हे पक्षी भारतात येतात. मजबूत पंख व विलक्षण सहनशक्तीच्या जोरावर हे पक्षी एका दिवसात सुमारे १५०० ते १६०० किलोमीटर अंतर पार करू शकतात. त्यांच्या डोक्यावर असलेल्या विशिष्ट पट्टेदार रचनेमुळे मराठीत त्यांना “पट्टकादंब” असेही म्हणतात. वजन साधारण सहा ते सात किलोपर्यंत असणारे हे मोठ्या आकाराचे पक्षी तलाव, धरणे, नद्या व गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतात. गवताचे अंकुर, बिया व शेवाळ हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.

हे हिवाळी पाहुणे नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत भारतात मोठ्या संख्येने स्थलांतर करतात. आसाममधील चिल्का सरोवर, राजस्थानमधील भरतपूर पक्षी अभयारण्य, महाराष्ट्रातील भिगवन, मायणी, वीर धरण परिसर तसेच कर्नाटकातील तुंगभद्रा नदीकाठ या ठिकाणी त्यांची नियमित उपस्थिती आढळते. मात्र सांगोला तालुक्यात एवढ्या मोठ्या संख्येने त्यांची नोंद प्रथमच झाल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.
सांगोला येथील पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे, प्रा. डॉ. विधीन कांबळे व प्रा. तानाजी यादव हे बुद्धेहाळ तलाव परिसरात निरीक्षणासाठी गेले असता त्यांना या दुर्मिळ पक्ष्यांच्या मोठ्या थव्याचे दर्शन झाले. त्यांनी सांगितले की, सांगोला परिसरातील शांतता, मुबलक पाणी व अन्नसाखळी यामुळे या परदेशी पाहुण्यांनी येथे मुक्काम केला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस तापमान वाढू लागल्यावर हे पक्षी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.
या देखण्या राजहंसांना तलावावर शिस्तबद्ध पद्धतीने पोहताना, आकाशात मध्यम उंचीवर उडताना किंवा तलावकिनारी गवत खाताना पाहण्यासाठी वन्यजीव छायाचित्रकार व पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने बुद्धेहाळ तलावाकडे आकर्षित होत आहेत. सांगोला तालुक्यातील हा निसर्ग सोहळा पक्षी निरीक्षकांसाठी दुर्मिळ पर्वणी ठरत आहे.



