शिरभावी पाणीपुरवठा योजनेचा तोटा ४१ कोटींवर; ३०० कोटींचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात
२१ वर्षांत शासनाची प्रतिपूर्ती नाही; ८२ गावांच्या पाणीपुरवठ्यावर आर्थिक संकटाचे सावट

शिरभावी पाणीपुरवठा योजनेचा तोटा ४१ कोटींवर; ३०० कोटींचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात
२१ वर्षांत शासनाची प्रतिपूर्ती नाही; ८२ गावांच्या पाणीपुरवठ्यावर आर्थिक संकटाचे सावट
सांगोला (दिलीप घुले): महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत झाल्यापासून सतत तोट्यात चालविली जात असून जानेवारी २०२६ अखेर या योजनेचा तोटा ४१ कोटी ६१ लाखांवर गेला आहे. योजनेचे वार्षिक उत्पन्न अडीच कोटी तर देखभाल दुरूस्तीचा खर्च सहा कोटी रूपये होत आहे. सततच्या तोट्यामुळे भविष्यात ही योजना बंद पडल्यास ८२ गावासह वाड्यावस्त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार हे मात्र निश्चित आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने २०१६ पासून देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान बंद केले असून या योजनेच्या प्रतिपूर्तीसाठी गेल्या २१ वर्षात एक रुपायादेखील दिला नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. दरम्यान, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नानंतर शिरभावी पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
योजना कार्यान्वित झाल्यापासून सतत तोट्यात चालत असून वार्षिक उत्पन्न अडीच कोटी तर देखभाल व दुरुस्तीचा खर्च सहा कोटी रुपयांपर्यंत जात आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जादा या तफावतीमुळे योजनेची आर्थिक घडी विस्कटली आहे. सांगोला तालुक्यातील गाव वाड्यावस्त्या पिण्याचे पाणी टंचाईमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची शिरभावीसह ८२ गावासाठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना युती सरकारच्या काळात मंजूर करण्यात आली होती. महाराष्ट्रातील एकमेव अविरतपणे सुरू असलेली शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सन २००५ साली कार्यान्वीत झाली. शासनाने ही योजना राबविताना सन २०३० सालापर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले. या योजनेतून ८२ गावांना दररोज २२ एमएलडी पाणी पुरवठा करण्याची क्षमता आहे.
शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत झाल्यापासून आजतागायत या योजनेचा तोटा सुमारे ४१ कोटी ६१ लाख रूपयापर्यंत गेला आहे. पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला वर्षाकाठी अडीच कोटी रूपये मिळत असून देखभाल दुरूस्ती खर्च सहा कोटी रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत या योजनेला वर्षाकाठीतून ते साडेतीन कोटीच्या आसपास तोटा सहन करावा लागत असल्याने उत्पन्न कमी आणि खर्च जादा अशी या योजनेची दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्र शासन या योजनेला वीज बिलापोटी दीड कोटी रुपयांचे अनुदान देत असून अनुदानाची रक्कम वजा जाता दरवर्षी दोन कोटी रूपयाचा निव्वळ तोटा सहन करावा लागत आहे.
२१ वर्षे तोटा सहन करणार्या या योजनेचा तोट्याचा आकडा तब्बल ४१ कोटी ६१ लाख रूपयाच्या घरात गेला आहे. येणाऱ्या काळात दुर्दैवाने सततच्या तोट्यामुळे पाणी पुरवठा योजना बंद पडल्यास ८२ गावासह वाड्यावस्त्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसून येत आहे. सन २०१६ पासून सरकारने या योजनेसाठी प्रोत्साहनपर देण्यात येणारे अनुदान देखील बंद केले आहे. सन २००५ साली ही योजना कार्यान्वित झाल्यापासून आजअखेर महाराष्ट्र सरकारकडून या योजनेच्या प्रतीपूर्तीसाठी एक रुपायादेखील दिला नसल्याने ही योजना आर्थिक संकटात सापडली असून दिवसेंदिवस या योजनेचा तोटा वाढतच आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्वरित या योजनेला आर्थिक मदत देऊन अविरतपणे ही योजना सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सततच्या तोट्यामुळे योजना आर्थिक संकटात सापडली असली तरी नूतनीकरणानंतर कार्यक्षमता वाढेल, खर्च नियंत्रणात येईल आणि ८२ गावांचा पाणीपुरवठा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शासनाने योजनेला दीर्घकालीन आर्थिक आधार देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शिरभावी पाणीपुरवठा योजना २७ जुलै २०२४ पासून बंद आहे. सदर योजनेच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ६०० किमीचे पाईपलाइनचे काम ९० टक्के पूर्णत्वास आले आहे. सदर योजनेच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी चाचणी सुरू आहे. शिरभावी पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून सर्वच ठिकाणी पाच एचपी ते ६८३ एचपी पर्यंतचे नवीन पंप बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. शिरभावी पाणीपुरवठा योजनेची कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता संजयकुमार स्वामी व शाखा अभियंता संजय कोळी यांनी दिली.



