थकबाकीच्या ओझ्याखाली शिरभावी पाणीपुरवठा योजना
५९ गावांकडे १ कोटी ६१ लाखांची थकबाकी; सहा वर्षांनंतरही मंगळवेढा–पंढरपूर पंचायत समितीकडील बिले प्रलंबित

थकबाकीच्या ओझ्याखाली शिरभावी पाणीपुरवठा योजना
५९ गावांकडे १ कोटी ६१ लाखांची थकबाकी; सहा वर्षांनंतरही मंगळवेढा–पंढरपूर पंचायत समितीकडील बिले प्रलंबित
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागांतर्गत कार्यरत शिरभावी व ८१ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवर थकबाकीचे संकट गडद झाले आहे. जानेवारी २०२६ अखेर ५९ गावांकडे तब्बल १ कोटी ६१ लाख ६१ हजार ५५८ रुपये इतकी थकबाकी असून योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनावर ताण निर्माण झाला आहे. सावे, चिंचोली, महूद बु., खवासपूर, लक्ष्मीनगर, वाढेगाव, मेथवडे, मांजरी, कोळा, वाकी नरळे वस्ती, जुजारपूर आदी गावे थकबाकीत आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
शिरभावीसह ८१ गावांना वर्षभर अखंडितपणे पाणीपुरवठा करणारी योजना म्हणून या योजनेचा राज्यात नावलौकिक आहे. पण वेळोवेळी थकबाकीची रक्कम वाढत असल्याने ही योजना आर्थिक संकटात सापडली आहे. अनेक गावांची थकबाकी मोठया प्रमाणावर आहे. दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात देखील वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे. सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यातही वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका अशी सांगोल्याची ओळख या योजनेमुळेच निर्माण झाली. मात्र वाढत्या थकबाकीमुळे योजनेच्या देखभाल, दुरुस्ती व नियमित खर्च भागविणे कठीण होत चालले आहे. अनेक गावांची थकबाकी लाखोंच्या घरात पोहोचल्याने प्रशासन चिंतेत आहे.
शिरभावी पाणीपुरवठा योजनेतील थकबाकी असलेली गावे पुढीलप्रमाणे, कंसात थकबाकीची रक्कम , शिरभावी (२,८२,१६९), संगेवाडी (९४,०५८), मेथवडे (१२,२९,२१५), मेथवडे माळी वस्ती (२,४७,५३२), देवळे (१,१८,६५०), मांजरी (९,४३,४२०), बामणी (२,६५,४२४), सावे (३,८५,५६९), धायटी (१,०१,०२९), चिंचोली (३,२३,८५८), हलदहिवडी (७२,३४९), वाकी शिवणे (२,७९,८६१), शिवणे (२,२८,७३२), खिलारवाडी (६०,६०७), महूद बु. (२७,४०,६०९), महिम (१,७४,३९५), गायगव्हाण (१८,५४९), देवकतेवाडी (२,७२,०१७), खवासपूर (४,३०,८९१), एखतपुर (९०,८५३), लोटेवाडी (२,३०,८४९), कटफळ (४,२८८), अचकदाणी (२,८४,४३४), लक्ष्मीनगर (५,१७,६५७), सोनलवाडी (१९,०११), बागलवाडी (६,६९७), वाकी नरळे वस्ती (४,५७,६१८), वाकी घेरडी (६३५), वाणीचिंचाळे (६८४), आलेगाव (२,३५,५८८), घेरडी (८५,०२६), मेडशिंगी (२०), वाढेगाव (१३,३६,८००), लोणविरे (२७,२३४), हणमंतगाव (१,०७५), कडलास (३०,७३६), आगलावेवाडी (२७,५८७), बुरुंगेवाडी (७४,८८०), जवळा (१,३३,९७४), राजूरी (९५), कारंडेवाडी (२,७८,९००), तरंगेवाडी (७०,३७५), भोपसेवाडी (२,६६,५७६), नाझरे (७३,१५४), वझरे (३,७१,२२३), अनकढाळ (४,२४६), अजनाळे (१३२), य. मंगेवाडी (८८,३३३), गोडसेवाडी (१२,३००), कमलापूर (३,४८५), अकोला वा. (२,५५,६९६), कोळा (७,२९,९०३), बुद्धेहाळ (१८,८५२), सोमेवाडी (१,५२,६१७), राजापूर (८७,५७३), हबीसेवाडी (१,३५,१३३), डिकसळ (३,९५५), हंगीरगे (१,४०,५४१), जुजारपूर (२,५०,४३०), हायवे कोळा (२०,८९८) अशी एकूण ५९ गावांकडे तब्बल १ कोटी ४७ लाख ९८ हजार ४६२ रुपयांची थकबाकी आहे.
तसेच शेतकरी सूत गिरणीकडे ७ लाख ५९ हजार १०० रुपये, महिला सूत गिरणीकडे २६ हजार ३८६, मंगळवेढा पंचायत समितीकडे २ लाख ८९ हजार २२६, पंढरपूर पंचायत समिती ४३ हजार २००, सांगोला तहसील कार्यालयाकडे २ लाख ४५ हजार १८५ अशी एकूण शिरभावी पाणीपुरवठा योजनेची थकबाकी १३ लाख ६३ हजार ०९६ रुपये इतकी आहे. तर मेटकरवाडी, चिकमहुद, इटकी, मानेगाव, डोंगरगाव, सोनंद, उदनवाडी, बलवडी, चिणके, निजामपूर, वाटंबरे, वासूद, केदारवाडी, पाचेगाव बुद्रुक, गौडवाडी, चोपडी, बलवडी, नराळे, पारे, जुनोनी, हटकर मंगेवाडी, हातीद, पाचेगाव खुर्द या २५ गावांनी थकबाकी भरली आहे.
वाढत्या थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने संबंधित गावांना व संस्थांना तातडीने देयके भरण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सांगोला तालुक्याच्या पाणी सुरक्षेसाठी शिरभावी योजनेचे आर्थिक सुदृढीकरण अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
चौकट
२०१८ च्या दुष्काळात नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शिरभावी योजनेमधून मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतु सहा वर्षांनंतरही मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीने शिरभावी योजनेची बिले थकवली आहेत. मंगळवेढा पंचायत समितीकडे २ लाख ८९ हजार २२६ रुपये, पंढरपूर पंचायत समितीकडे ४३ हजार २०० रुपये, सांगोला तहसिल कार्यालयाकडे २ लाख ४५ हजार १८५ इतकी थकबाकी आहे.
चौकट २
शिरभावी पाणीपुरवठा योजना २७ जुलै २०२४ पासून बंद आहे. सदर योजनेच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ६०० किमीचे पाईपलाइनचे काम ९० टक्के पूर्णत्वास आले आहे. सदर योजनेच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी चाचणी सुरू आहे. शिरभावी पाणीपुरवठा योजनेची कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता संजयकुमार स्वामी व शाखा अभियंता संजय कोळी यांनी दिली.



