शेकापचा गड ढासळला; चोपडी गटात भाजपचे कमळ फुलले
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा तब्बल ६ हजार ८४७ मतांनी दणदणीत विजय

शेकापचा गड ढासळला; चोपडी गटात भाजपचे कमळ फुलले
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा तब्बल ६ हजार ८४७ मतांनी दणदणीत विजय
सांगोला (प्रतिनिधी): वर्षानुवर्षे अभेद्य मानल्या गेलेल्या चोपडी जिल्हा परिषद गटात यंदा राजकीय इतिहास रचला गेला. शेकापच्या बालेकिल्ल्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली. महायुतीने दमदार कामगिरी करत गटावर झेंडा रोवला असून भाजपचे कमळ पहिल्यांदाच दिमाखात फुलले. महायुतीचे उमेदवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी शेकाप आघाडीचे उमेदवार विजयकुमार शिंदे यांचा तब्बल ६ हजार ८४७ मतांनी पराभव करत दणदणीत विजय संपादन केला.

निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी राबवलेली शिस्तबद्ध प्रचारयंत्रणा आणि बूथनिहाय आखणी निर्णायक ठरली. गावागावांत थेट संपर्क, मतदारांशी साधलेला संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर दिलेला भर यामुळे महायुतीची पकड मजबूत होत गेली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, तसेच माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे ‘परफेक्ट’ नियोजन यामुळे वातावरण महायुतीच्या बाजूने झुकल्याचे चित्र दिसून आले. चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी बेरजेचे राजकारण अचूक साधत विविध स्तरांवरील मतदारांना एकत्र आणण्यात यश मिळवले. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा ध्यास, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रचारामुळे विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दुसरीकडे, शेतकरी कामगार पक्ष व आघाडीच्या प्रचारात अपेक्षित एकजूट व समन्वयाचा अभाव जाणवल्याची चर्चा आहे. प्रचारादरम्यान ‘बाहेरचा उमेदवार’ या मुद्द्यावर अधिक भर देण्यात आला; मात्र विकासाच्या ठोस अजेंड्याची प्रभावी मांडणी न झाल्याने मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक उमेदवार असूनही आघाडीच्या नेत्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. मतदारांनी दिलेल्या स्पष्ट कौलामुळे चोपडी जिल्हा परिषद गटातील पारंपरिक राजकीय समीकरणे बदलल्याचे दिसून आले. महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्या विजयामुळे महायुतीत उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. या निकालाने आगामी स्थानिक राजकारणात नवी समीकरणे आकार घेण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.



