सोनंद पंचायत समिती गणातून डॉ. सौ. स्वाती परेश खंडागळे निवडणूक लढवणार

सोनंद पंचायत समिती गणातून डॉ. सौ. स्वाती परेश खंडागळे निवडणूक लढवणार
सोनंद (प्रतिनिधी): सोनंद पंचायत समिती गणातून डॉ. सौ. स्वाती परेश खंडागळे यांनी उमेदवारी जाहीर करताना विकास, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा ठाम संकल्प जनतेसमोर मांडला आहे. “सोनंद पंचायत समिती म्हणजे एक परिवार” या भावनेतून त्या संपूर्ण गणाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. खंडागळे यांनी आपल्या जाहीरनाम्यात महिलांसाठी विशेष प्राधान्य देत अनेक ठोस उपक्रमांची घोषणा केली आहे.
महिलांसाठी मोफत वैद्यकीय सेवा, बचतगटांची स्थापना, तसेच उद्योग-व्यवसायासाठी मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांचा विशेष भर आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे हेच आपल्या कार्याचे मुख्य ध्येय असल्याचे त्या सांगतात.
यासोबतच गणातील सर्व नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि गरजा समजून घेऊन त्या तत्परतेने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्ट्रीट लाईट्स अशा मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून काम केले जाईल.
सामाजिक एकतेला बळ देण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, तसेच गरजू कुटुंबांना आधार देणारे उपक्रम राबवण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. “सेवा हीच राजकारणाची खरी ओळख” या तत्वावर काम करताना, आपले संपूर्ण कुटुंब २४ तास जनसेवेसाठी तत्पर राहील, असा ठाम शब्द त्यांनी मतदारांना दिला आहे.
डॉ. सौ. स्वाती परेश खंडागळे यांची उमेदवारी म्हणजे केवळ निवडणूक नव्हे, तर सोनंद गणासाठी विश्वास, विकास आणि समर्पणाचा नवा अध्याय असल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे. महिला, युवक, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी त्यांची वाटचाल निश्चितच दिशादर्शक ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.



