सूर्योदय परिवाराचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न
लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीने सांगोल्यात फुलला मकरसंक्रांतीचा आनंद

सूर्योदय परिवाराचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न
लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीने सांगोल्यात फुलला मकरसंक्रांतीचा आनंद
होम मिनिस्टर उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला (प्रतिनिधी) : उद्योग, व्यवसाय, कृषी, सहकार आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सूर्योदय परिवाराच्या वतीने सांगोला येथे मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित हळदीकुंकू समारंभ महिला भगिनींच्या अलोट गर्दीत अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.
सांगोला येथील सूर्योदय बँक्वेट हॉल परिसरात पार पडलेल्या या समारंभासाठी सांगोला शहरासह परिसरातील विविध स्तरांतील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यशस्वी उद्योजिका, विविध क्षेत्रांतील महिला अधिकारी, गृहिणी, शेतकरी व शेतमजूर महिलांचा या कार्यक्रमात उल्लेखनीय सहभाग दिसून आला.
या भव्य आयोजनात सूर्योदय महिला अर्बन, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ४३ शाखांच्या माध्यमातून कार्यरत असलेली एल.के.पी. मल्टीस्टेट (सांगोला शाखा), सोलापूर व सांगली जिल्ह्यातील दूध संकलनासाठी कार्यरत सूर्योदय दूध विभाग, तसेच सूर्योदय मॉल, वस्त्रनिकेतन व फर्निचर मॉल यांचा सक्रिय सहभाग होता.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन निवेदक भारत मुढे यांनी केले. त्यांच्या खास शैलीतील “खेळ पैठणीचा” (होम मिनिस्टर) उपक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाला रंगत आणली. विविध उपक्रमांमध्ये सहभागी महिलांना सूर्योदय परिवारातर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यामध्ये काजल जाधव, मयुरी कांबळे, वैशाली दिघे, सुवर्णा काटे व सविता शिंदे यांनी सूर्योदय परिवाराची मानाची पैठणी पटकावली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी आपल्या प्रस्ताविकातून सूर्योदय अर्बन व एल.के.पी. मल्टीस्टेटमधील बँकिंग सुविधा, विविध योजना व बचतीचे महत्त्व महिलांना पटवून दिले. ग्राहकांचा अतूट विश्वास व जनसामान्यांचा आशीर्वाद हीच सूर्योदय परिवाराची खरी ताकद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सूर्योदय परिवाराच्या संचालिका सौ. सुरेखाताई लवटे यांनी समयोचित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमास मंचावर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या पत्नी सौ.वैशाली घुगे, डॉ. बंडोपंत लवटे, सुभाष दिघे गुरुजी, सौ. अर्चनाताई इंगवले, सौ. ज्योतीताई भगत, सौ. मीनाक्षीताई दिघे, सौ. ज्योती सावंत, सौ. अर्चना इंगोले, सीईओ सौ. सुप्रिया जाधव, सौ. वर्षाराणी बिले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहसंस्थापक जगन्नाथ भगत यांनी कुटुंबात आनंदी व तणावमुक्त वातावरण राखण्याबाबत मार्गदर्शन करत सूर्योदय मॉल, वस्त्रनिकेतन, फर्निचर मॉल व नव्याने उभारलेल्या बँक्वेट हॉलच्या सुविधांची माहिती दिली व उपस्थित महिलांचे आभार मानले. मोठ्या गर्दी असूनही उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था व उत्तम सुविधांमुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय समूहातील कर्मचारी वृंदांनी घेतलेले अथक परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरले.



