राजकीय

सत्तेपेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य; यशराजे साळुंखे पाटील यांचा गावागावांत संवाद

पराभवानंतरही जनतेच्या दारी; सेवाभावाचा शब्द पाळत आभार दौरा

सत्तेपेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य; यशराजे साळुंखे पाटील यांचा गावागावांत संवाद

पराभवानंतरही जनतेच्या दारी; सेवाभावाचा शब्द पाळत आभार दौरा

सांगोला (प्रतिनिधी): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वातावरण अजूनही तापलेले असतानाच, जवळा जिल्हा परिषद गटातून अल्प मतांनी पराभूत झालेले युवा नेते ॲड. सूर्यादित्य (यशराजे) साळुंखे पाटील यांनी कृतीतून वेगळा संदेश दिला आहे. पराभवाने खचून न जाता दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू करत, “निवडणूक ही सत्तेसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी आणि सेवेचे साधन आहे,” हा संदेश अधोरेखित केला.

जवळा जिल्हा परिषद गटातील संगेवाडी, मांजरी, बामणी, मेथवडे, सावे, राजापूर, वाढेगाव, देवळे, मेडशिंगी, आलेगाव, वाकी-घेरडी, वाणीचिंचाळे आणि जवळा या १३ गावांमध्ये जाऊन त्यांनी मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले. प्रत्येक गावात नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “पराभव झाला म्हणून घरात बसणार नाही; तुमच्या सुख-दुःखात कायम उभा राहीन.”

या आभार दौऱ्यात वाढेगाव पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या वंदना भरत शेळके तसेच जवळा पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या पुनम सुदर्शन इंगवले यांनीही विविध गावांमध्ये उपस्थित राहून मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानले. दोन्ही मान्यवरांनी “जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे रूपांतर विकासकामांमध्ये करून दाखवू,” असा विश्वास व्यक्त करत आगामी काळात एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली.

यावेळी बोलताना यशराजे साळुंखे पाटील म्हणाले, “गत निवडणुकीत आपण जनतेसमोर जी वचने दिली, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न यापुढेही जोमाने सुरू राहील. झालेला पराभव विसरून आपण विकासाच्या दिशेने एकत्र वाटचाल करूया.” त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांनाही विशेष दाद देत सांगितले, “कार्यकर्त्यांच्या भावना हीच माझी खरी शिदोरी आहे.” पराभवाच्या पार्श्वभूमीवरही त्यांच्या या दौऱ्याला गावागावांत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी कार्यकर्ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. काहींच्या डोळ्यांत अश्रू तर काहींच्या आवाजात नव्या जिद्दीची चाहूल जाणवत होती.

यशाने यंदा हुलकावणी दिली असली तरी अपयशाने खचणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी सांगितले, “आमच्या साळुंखे पाटील कुटुंबाच्या रक्तातच जनसेवा आहे. लोकसेवेची बांधिलकी भविष्यातही तेवढ्याच ताकदीने जपणार आहे.” तसेच आजपासून संपूर्ण जवळा गटासह सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात तरुणांशी संवाद साधून तरुणांची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक दौरा हाती घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पराभवाच्या सावटातही सेवाभाव, जिद्द आणि जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचा निर्धार व्यक्त करत ॲड. यशराजे साळुंखे पाटील यांनी आगामी काळातही लोकहितासाठी अविरत कार्यरत राहण्याचा शब्द दिला आहे. राजकारणात पराभवानंतरही जनतेच्या दारी राहण्याची ही भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!