बातमी शेतीची ! जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या..!
उडीद, सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती, १३२ टक्के खरिपाचा पेरा

सर्वाधिक साखर कारखान्यांचा ऊसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीने उच्चांक गाठला असून उसापाठोपाठ उडीद आणि सोयाबीनच्या पेरणीने उच्चांक गाठला आहे. पोषक पाऊस हवामानामुळे २ लाख ३८ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रात उडीद व सोयाबीनचा पेरा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ८३१ हेक्टर (१३२ टक्के) क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनचा पेरा १ लाख ३१ हजार ९७८ हेक्टर तर उडिदाचा पेरा १ लाख ०६ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर गेला आहे.
सोलापूर जिल्ह्यात कृषी विभागाने यंदा खरीपासाठी ३ लाख ३७ हजार ९६८ हेक्टर क्षेत्र गृहित धरुन हंगामाचे नियोजन केले होते. मात्र यंदा सोलापूर जिल्ह्यात जवळपास साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर यंदा सर्वाधिक १ लाख ३१ हजार ९७८ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. यंदा शेतकऱ्यांच्या हातात खरीप पीक लागणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे खरीपाच्या पेरण्यानी उच्चांक गाठला आहे.
यंदाच्या हंगामात गळीत धान्यामध्ये सोयाबीन आणि उडीद पिकाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. यंदा पेरणी विक्रमी झाली असल्याने यंदा खरिपाच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी लागवड क्षेत्र ८१ हजार २७० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ३१ हजार ९७८ हेक्टर (१८७ टक्के) क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला आहे. मका ८७ हजार ६८४ हेक्टर (१८३ टक्के), तूर ८२ हजार ६८७ हेक्टर (९६ टक्के), मूग ६ हजार ६२३ हेक्टर (४५ टक्के), उडीद १ लाख ०६ हजार ६०८ हेक्टर (१८३ टक्के), बाजरी २२ हजार ५६७ हेक्टर (६२ टक्के), सूर्यफूल ३ हजार ३२७ हेक्टर (४० टक्के), भुईमुग ३ हजार ४७४ हेक्टर (६६ टक्के), खरीप ज्वारी २० हेक्टर, इतर कडधान्य १८ हेक्टर, तीळ ८ हेक्टर, कारळ ५ हेक्टर, कापूस ८२७ हेक्टर, नवीन ऊस लागवड ३२ हजार ६११ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.