शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ का फिरवली ?

शासनाने यंदापासून एक रुपयात पीक विमा योजना बंद करून सुधारित पंतप्रधान पिक विमा योजना लागू केली. या योजनेला शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याने शासनाने या योजनेला तीनदा मुदतवाढ दिली. पण, यानंतरही या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत कर्जदार व विना कर्जदार अशा एकूण १ लाख ७४ हजार ८९७ शेतकऱ्यांनी ३ लाख २९ हजार ३९९ अर्जाद्वारे २ लाख ४८ हजार ९३१ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविला आहे. शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद करून या वर्षीपासून सुधारित पीक विमा योजना लागू केली. तसेच पीक कर्जाची उचल करणान्या शेतकऱ्यांसाठीसुद्धा ही योजना ऐच्छिक केली. त्यामुळे योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे, कारण राज्य सरकारने १ रुपया पीक विमा योजना बंद केली असून, आता शेतकऱ्यांना वाढीव हप्ता भरावा लागत आहे. तसेच, नुकसान भरपाईच्या पद्धतीत बदल करण्यात आला असून, आता पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई दिली जाणार आहे, यामुळे शेतकरी नाराज आहेत.
मागील तीन-चार वर्षातील पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांचा अनुभव चांगला नाही. नुकसान होऊनसुद्धा विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. तीनदा मुदतवाढ देण्याची वेळसुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शासनाने या योजनेला जुलैमध्ये आणि त्यानंतर १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. पण, यानंतरही अल्पप्रतिसाद मिळत असल्याने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. पण, यानंतरही शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे.
सोलापूर जिल्ह्यात एकूण साडेपाच लाख खातेदार शेतकरी आहेत. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ८३१ हेक्टर (१३२ टक्के) क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. कर्जदार व विना कर्जदार अशा एकूण १ लाख ७४ हजार ८९७ शेतकऱ्यांनी ३ लाख २९ हजार ३९९ अर्जाद्वारे २ लाख ४८ हजार ९३१ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविला आहे. यंदा खरिपात कमी विमा अर्ज येण्यामागे फार्मर आयडी ची सक्ती हेदेखील प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. कारण अनेक शेतकऱ्यांकडे सध्या फार्मर आयडी नाही. तसेच, सर्वाधिक नुकसानभरपाई मिळणारे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई हे ट्रिगर सुधारित योजनेत वगळण्यात आले आहेत. केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे पाठ फिरवली आहे.
तालुका निहाय पीक विमा माहिती
अक्कलकोट तालुक्यात 48,619 हेक्टर, बार्शी 75,186 हेक्टर, करमाळा 16,493 हेक्टर, माढा 18,146 हेक्टर,. माळशिरस 2494 हेक्टर, मंगळवेढा 2262 हेक्टर, मोहोळ 964 हेक्टर, पंढरपूर 712 हेक्टर, सांगोला 23 हजार 004 हेक्टर, उत्तर सोलापूर 15 हजार 004 हेक्टर, दक्षिण सोलापूर 16,947 हेक्टर अशा एकूण सोलापूर जिल्ह्यातील 2 लाख 48 हजार 931 हेक्टर वरील खरीप हंगामातील पिकांचा पीक विमा उतरवला आहे
एक रुपयात पीकविमा योजना थांबल्यानंतर घटले सहभागी
२०२३ पासून सुरू झालेल्या एक रुपयात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र, गैरप्रकारांच्या तक्रारींनंतर २०२५ पासून ही योजना गुंडाळण्यात आली. आता पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता स्वतः भरावा लागतो. योजनेसाठी फार्मर आयडी व ई-पीक पाहणी सक्तीची केली आहे, पूर्वी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांत कंपनीला माहिती देऊन पंचनाम्यावर भरपाई दिली जात होती. आता मात्र पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई दिली जाईल, त्यामुळे भरपाई मिळण्याची आशा कमी असल्याने अनेक शेतकरी दूर राहिले आहेत.