अस्तित्व संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या महिलांचा सन्मान

अस्तित्व संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या महिलांचा सन्मान
सांगोला (प्रतिनिधी): अस्तित्व संस्थेच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मांजरी ता. सांगोला येथे महिला मेळावा व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अस्तित्व संस्थेच्या वतीने कर्तुत्ववान सावित्रीच्या लेकींचा विशेषतः विधवा महिला, सयमी, गुणवान माता, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आरोग्यसेविका,आशावर्कर, बचतगट, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, माजी महिला सरपंच, सामाजिक कार्यकर्त्या, तरूण महिला उद्योजिका, एकल -विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला.
अस्तित्व संस्थेच्या कार्यकर्त्या अर्चना खर्चे यांनी सावित्रीमाईंची ओवी सादर करून महिला मेळाव्याची सुरुवात केली. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात अस्तित्व संस्थेच्या कामाविषयी माहिती सांगताना अस्तित्व संस्था गेल्या 25 वर्षापासून आपल्या भागात सामाजिक प्रश्नांवर काम करीत असल्याचे सांगितले. तसेच महिला-मुलींची असुरक्षितता, मुलगा-मुलगी समानता,स्री पुरूष समानता, महिलांच्या आरोग्याची सध्याची परिस्थिती, आजारांचे वाढते प्रमाण, ॲनिमियाचे वाढते प्रमाण व उपाय योजना, सकस आहार, स्वयंपाकासाठी आवश्यक लोखंडी कढई, आहारात पालेभाज्या, रानभाज्यांचे महत्व सांगितले. “अन्न हेच औषध” हा आरोग्य विषयी संदेश त्यांनी दिला. विधवा महिलांसाठी पेन्शन योजना,प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना अशा विविध शासकीय योजनाविषयी माहिती सांगितली
या कार्यक्रमामध्ये महिलांच्या मनोरंजासाठी, संगीत खुर्ची, धागा सोडणे इ.स्पर्धा घेऊन विजेत्या महिला स्पर्धकास बक्षीसही देण्यात आले. तसेच रंग,फुगडी खेळून महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्तित्व संस्थेच्या कार्यकर्त्या अक्षता सोनवले यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मांजरी गावातील सपना बनसोडे, हेमलता कांबळे, दिक्षा उबाळे, सारिका घाडगे, निलम उबाळे, सुजाता भुसे, विनोद उबाळे, यश सोनवले, आदित्य तोरणे यांच्यासह महिला व युवकांनी सहकार्य केले. अस्तित्व संस्थेच्या कार्यकर्त्या अक्षता सोनवले यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन उपस्थित महिलांचे आभार मानले.



