“लकी ड्रॉ” ऐवजी “प्रथम” येणाऱ्यास प्राधान्य..!

शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता लॉटरी पद्धत (लकी ड्रॉ) बंद करण्यात आली आहे. कृषी विभागाने केलेल्या या महत्त्वपूर्ण बदलानुसार, आता ‘प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून, अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या नव्या धोरणामुळे प्रक्रिया सुलभहोणार असून, पारदर्शकता येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी योजनाशेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत सुधारणा करण्यासाठी शासकीय योजना उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंप संच, शेडनेट, पॉलिहाऊस, सिंचन विहीर, कृषी यांत्रिकीकरण यासारख्या योजनांचा समावेश आहे. लकी ड्रॉ योजना आतापर्यंत कृषी योजनांच्या लाभासाठी लॉटरी पद्धत वापरली जात होती. शेतकरी मोठ्या संख्येने अर्ज करत असले, तरी फक्त सोडतीत ज्या शेतकऱ्यांचे नाव येईल त्यांनाच या योजनांचा लाभ मिळत होता. पूर्वीच्या ‘लकी ड्रॉ’ पद्धतीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या. वर्षांनुवर्षे अर्ज करूनही, केवळ नशिबावर अवलंबून असल्यामुळे, फक्त काही निवडक शेतकऱ्यांनाच योजनांचा लाभ मिळत होता. ३५ ते ५० टक्क्यांहून कमी शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा मिळत असल्याने, अनेकांमध्ये निराशा आणि नाराजी वाढत होती. यामुळे त्यांचा वेळ आणि मेहनत वाया जात होती.
या सर्व अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने आता ‘प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य’ हे नवीन धोरण लागू केले आहे. यानुसार, जो शेतकरी आधी अर्ज करेल आणि त्याची कागदपत्रे पूर्ण असतील, त्याला योजनेचा लाभ आधी दिला जाणार आहे. या नवीन धोरणामुळे अनेक महत्त्वाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पीक विमा योजना, सिंचन सुधारणा योजना, आधुनिक शेतीसाठी अनुदान, शेतकरी कर्ज सुविधा आणि इतर अनेक योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य देणे आहे.
अर्ज कसा आणि कुठे करायचा…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना, आपली जमीन, पिकांची माहिती आणि इतर वैयक्तिक तपशील अचूक भरावा. जर माहिती चुकीची किंवा अपूर्ण असेल, तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. ऑनलाईन अर्ज केल्यामुळे प्रक्रिया जलद आणि सुरक्षित होते. यामुळे कृषी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे आणि योग्य वेळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.