सांगोला तालुक्यात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा

शेतकऱ्यांचा लाडका सण असलेला बैलपोळा सण संपूर्ण सांगोला तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला. शेतकऱ्यांचे बैलांप्रती असलेले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सहभाग घेऊन ग्रामीण संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश दिला.
बैलपोळा हा महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे. हा सण श्रावण अमावास्येला म्हणजेच पिठोरी अमावास्येला साजरा केला जातो. यंदा हा सण २२ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहाने साजरा झाला. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अचकदाणी गावातील शेतकऱ्यांसोबत एकत्र येऊन हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. बैलांच्या शिंगांना तेल आणि हळद लावून, त्यांच्या गळ्यात घुंगरांच्या माळा, रंगीबेरंगी फिती आणि फुलांच्या माला घालण्यात आल्या. त्यांच्या पाठीवर सुंदर नक्षीकाम केलेली झूल टाकण्यात आली, तर पायांना तोडे घालून त्यांना सजवण्यात आले. या सजावटीमुळे बैलांचा आकर्षक आणि उत्सवमय देखावा निर्माण झाला.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळी, वडे आणि कढीचा नैवेद्य दाखवला. यावेळी त्यांनी बैलांना गोडधोड खाऊ घालून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “बैल हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या या झाले. मूक प्राण्यांबद्दल आपण आदर आणि प्रेम व्यक्त करायलाच हवे, असे आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि बैलांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. या सणाद्वारे शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते साजरे केले जाते, असेही ते म्हणाले. हा सण केवळ शेतकऱ्यांचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाचा एकता आणि बंधुभाव वाढवणारा आहे. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सहभागाने शेतकरी वर्गामध्ये उत्साह वाढला.