शेतकऱ्यांनी डाळिंब आणि केळी उत्पादन वाढीसाठी ॲग्रीकॉस पॅटर्नचा वापरावा : अजय आदाटे
शेतकऱ्यांनी डाळिंब आणि केळी उत्पादन वाढीसाठी ॲग्रीकॉस पॅटर्नचा वापरावा : अजय आदाटे
प्रतिनिधी:- शेतकऱ्यांचे पिक व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे डाळिंब आणि केळी उत्पादन घटत चालले आहे. त्यामुळे पंढरपुरातील शेतकऱ्यांनी आता डाळिंब व केळी एकरी निर्यातक्षम उत्पादन वाढवण्यासाठी रॉबिनहूड टेक्नॉलॉजीचा वापर वाढवायला हवा, असे मत ॲग्रीकॉस एक्स्पोर्टस् प्रा . लि . चे टेक्नीकल डायरेक्टर अजय आदाटे यांनी सुपली (पंढरपूर) येथे व्यक्त केले. कृषी दिनाच्या निमित्ताने जे शेतकरी चांगल्या पद्धतीने शेती करतात आधुनिक तंत्रज्ञान वापरतात अशा प्रभाकर जनार्दन माळी, शरद मनोहर येलमार , चंद्रप्रभु दादासो मिरजे, या तीन शेतकऱ्यांना ॲग्रीकॉस शेती पुरस्कार देण्यात आला.
कमी खर्चात उत्पन्न जास्त कसे वाढेल यासाठी पीक लागणीपासून कापणीपर्यंतचे तंत्र समजून घेतले पाहिजे. शेताची पंचसूत्री लक्षात घेतली पाहिजे. यामध्ये पाण्याचे, खताचे नियोजन, माती व पाणी परीक्षण, जमिनीच्या प्रतिनुसार बेसळ डोस आणि कीड व्यवस्थापन अशा प्रकारची योग्य ती काळजी घेतली तर उत्पन्नात वाढ होऊन खर्च कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अजय आदाटे यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील मोहा येथील आर्यन ऍग्रो एजन्सी, सुपली येथे कृषी दिनाच्या निमित्ताने डाळिंब आणि केळी महा चर्चा सत्राचे आयोजन केले होते. बळीराजाच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली, यावेळी कार्यक्रमास शिवाजी येलमार, मेजर मच्छिंद्र घाटुळे, प्रकाश येलमार, नाना काळे , सुधाकर बडके आणि सुपली ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते आदाटे यांनी अमेरिकास्थित निक या शरीराने अपंग परंतु ना उमेद न होता जिद्दीने अनेक विक्रम करणाऱ्या व्यक्तीचे चलचित्र दाखवून शेतकऱ्यामध्ये चैतन्य भरण्याचा प्रयत्न केला. आज शेतकरी शेतात करत असलेले कष्ट व त्याचा योग्य तो मोबदला मिळतो का? याचा विचार करता हातात काहीही राहत नाही, असे दिसते. याचे कारण त्यासाठी उत्पन्न वाढीसाठी लागणारे ज्ञान याबाबत शेतकरी जागृत नसतो. यासाठी डाळिंब बहार तंत्रज्ञान समजून घेणे महत्वाचे ठरते. डाळिंब आणि केळी हे पीक नगदी पीक असून शेतकन्याचा आर्थिक कणा समजला जातो. त्यासाठी केळी आणि डाळिंब उत्पन्न घेत असताना त्याबाबतची योग्य ती खबरदारी व त्यासाठी योग्य ते तंत्रज्ञाणाचा उपयोग केला पाहिजे.
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड पाहिजे स्वाती काळे :
■ यावेळी प्रगतशील शेतकरी स्वाती काळे यांनी चर्चात शेतकऱ्यांना आधुनिक काळाला तंत्रज्ञानाची व अभ्यासू वृत्तीची जोड दिली पाहिजे. क्षेत्र कोणतेही असो काळानुरूप आपल्यात बदल केले पाहिजे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात जास्त व उत्तम दर्जाचे उत्पन्न काढले तर उद्याचा काळ आपलाच असेल हे मात्र नक्की. त्यासाठी शेतकऱ्यांना तज्ञ मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांना कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे : प्रकाश येलमार
■ शेतकऱ्याच्या कष्टाचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे. तो जगला पाहिजे. त्याची आर्थिक उन्नती झाली पाहिजे. व तो खऱ्या अर्थानि राजा झाला पाहिजे म्हणून शेतकऱ्याला केंद्रस्थानी मानून आर्यन उद्योग समूह ही संस्था उभी केली. यामध्ये शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी शेतीपूरक असे वेगवेगळ्या चर्चा सत्राचे आयोजन असेल, खत पाणी नियोजनासाठी, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर असेल हे विना विलंब सेवा देण्याचे काम करतो. याचाच एक भाग म्हणून केळी आणि डाळिंब लागवड तंत्रज्ञानाचे अभ्यासक असलेले कृषीमित्र अजय आदाटे आणि स्वाती काळे यांच्या चर्चा सत्राचे आयोजन केले होते. यापुढेही शेतीपूरक व संबंधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. कारण आशाप्रकारची चर्चासत्र व मार्गदर्शन ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन आर्यन उद्योग समूहचे प्रकाश येलमार यांनी केले.
केवळ शरीराने काम न करता डोक्याने काम करत आधुनिकतेची कास धरत त्याला तंत्रज्ञानाची साथ द्यायला पाहिजे. केळी लागवड करत असताना एक्सपोर्ट नियोजन, शाश्वत केळी आणि डाळिंब उत्पादनाची सूत्रे, हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन, केळी डाळिंब पिकावरील किडींचे व्यवस्थापन व केळी, डाळिंब पिकामधील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पिकास घ्यावयाच्या फवारण्या व कमी पाण्यातील केळी आणि डाळिंब पिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले. शेवटी सर्व शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक लकी ड्रॉ घेऊन त्यांना फुलसोना आणि रॉबिन 555 ही औषधे भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्थाविक व सूत्रसंचालन अभिजित जाधव यांनी केले.



