नवी डिजिटल यंत्रणा! फसवणुकीतील गमावलेली रक्कम आता थेट बँक खात्यात
ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम' आणि 'एमआरएम' पोर्टल कार्यान्वित; न्यायालयीन लढाईशिवाय नागरिकांना मोठा दिलासा

नवी डिजिटल यंत्रणा! फसवणुकीतील गमावलेली रक्कम आता थेट बँक खात्यात
ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम’ आणि ‘एमआरएम’ पोर्टल कार्यान्वित; न्यायालयीन लढाईशिवाय नागरिकांना मोठा दिलासा
सांगोला (प्रतिनिधी): दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कोट्यवधी रुपये क्षणार्धात लंपास होत आहेत. ऑनलाईन गुंतवणूक, बनावट कर्ज, डिजिटल अरेस्ट, केवायसी अपडेट, यूपीआय व्यवहार, सोशल मीडिया हॅकिंग अशा विविध माध्यमांतून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत सायबर गुन्ह्यांतील पीडितांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. फसवणुकीमुळे गमावलेली रक्कम आता थेट संबंधित नागरिकांच्या बँक खात्यात परत मिळवून देण्यासाठी सायबर गुन्हे समन्वय केंद्राने ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम’ (जीआरएम) आणि ‘मनी रिस्टोरेशन मॉड्यूल’ (एमआरएम) ही दोन पोर्टल्स सुरू केली आहेत. यामुळे न्यायालय आणि बँकांच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका होऊन लवकर न्याय मिळू शकणार आहे.
सायबर फसवणूक झाल्यानंतर आतापर्यंत नागरिकांना सर्वप्रथम पोलिसांकडे तक्रार, त्यानंतर बँकेशी संपर्क, विविध कागदपत्रे, न्यायालयीन आदेश आणि दीर्घ प्रशासकीय प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते. अनेकदा पैसे गोठवले जात असले तरी ते परत मिळण्यासाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. आता ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम (GRM) आणि मनी रिस्टोरेशन मॉड्यूल (MRM) या दोन डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि अधिक परिणामकारक करण्यात आली आहे. या प्रणालींमुळे फसवणूक झालेली रक्कम परत मिळवणे आणि चुकीची गोठवलेली बँक खाती पूर्ववत करणे सुलभ झाले आहे. सायबर फसवणुकीत गमावलेले पैसे ऑनलाइन परत मिळवण्यासाठी एमआरएम पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा आहे. या यंत्रणेमुळे पोलिस, बँका आणि राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल यांच्यात थेट समन्वय साधला जाणार असून, निर्धारित कालमर्यादेत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या नव्या यंत्रणेमुळे सायबर फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच संबंधित व्यवहाराची माहिती तातडीने सर्व संबंधित बँका, आर्थिक संस्था आणि तपास यंत्रणांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. संशयित खात्यातील रक्कम त्वरित गोठवून तिची पडताळणी केली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र पीडितांच्या खात्यात ती रक्कम थेट जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयीन आदेशांची प्रतीक्षा करण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलशी ही प्रणाली जोडण्यात आली असून, पोलिस, बँका आणि आर्थिक संस्थांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यात आला आहे. परिणामी, फसवणूक झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांतच प्रभावी कारवाई करून पैसे वाचविण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
‘गोल्डन अवर’ ठरणार अत्यंत महत्त्वाचा
सायबर तज्ज्ञांच्या मते, फसवणूक झाल्यानंतरचे पहिले काही तास अत्यंत निर्णायक असतात. या कालावधीत तक्रार दाखल झाल्यास व्यवहार गोठविणे आणि रक्कम परत मिळविण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे फसवणूक झाल्याचा संशय येताच विलंब न करता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधणे किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.
बँका आणि पोलिसांची जबाबदारीही वाढणार
नवीन प्रणालीमुळे संबंधित बँकांना संशयित व्यवहार तातडीने गोठविण्याची आणि तपास यंत्रणांना आवश्यक माहिती देण्याची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडावी लागणार आहे. पोलिसांकडूनही तक्रारींची तातडीने पडताळणी करून रक्कम परत मिळवून देण्याची प्रक्रिया जलदगतीने राबविली जाणार आहे.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी घ्या ही काळजी…
ओटीपी, यूपीआय पिन, सीव्हीव्ही, नेटबँकिंग पासवर्ड कोणालाही सांगू नका.
अनोळखी लिंक, क्यूआर कोड किंवा मोबाईल अॅपवर विश्वास ठेवू नका.
सोशल मीडियावरील आकर्षक गुंतवणूक योजनांपासून सावध राहा.
बँकेच्या नावाने आलेले संशयास्पद कॉल किंवा संदेश त्वरित पडताळा.
हा नंबर लक्षात ठेवा…
कोणतीही ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरीत राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० या क्रमांकावर संपर्क करा. किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. जेणेकरून फसवणुकीची रक्कम बँक खात्यात होल्ड करणे शक्य होणार आहे. गोठवलेली खाती पुन्हा अँक्टिव्ह केली जातात.
काय आहे ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम…
सायबर गुन्हे तपासादरम्यान संशयास्पद व्यबहारांमुळे बिनाकारण किंवा चुकीच्या पद्धतीने गोठवलेली बैंक खाती अनफ्रीज करण्यासाठी ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम पोर्टल महत्त्वाचे आहे. खातेधारकांना त्यांच्या खात्यावरील कारवाईचे पुनरावलोकन मागवण्याची संधी मिळते. यामध्ये बैंक अधिकारी, तपास अधिकारी आणि गृह मंत्रालय थेट समन्वय साधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पडताळणी करून निर्णय घेतात.
सायबर फसवणुकीतील रक्कम परत मिळविण्यासाठी नागरिक स्वतः किंवा पोलिसांच्या मदतीने एमआरएम पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र, संबंधित बँकेने रिस्टोरेशनची माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत केल्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ज्या नागरिकांची बँक खाती पोलिसांनी गोठविलेली आहेत, त्यांनी बँक शाखेशी संपर्क साधून जीआरएम पोर्टलद्वारे तक्रार नोंदवावी. सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तत्काळ हेल्पलाइनचा व जीआरएम, एमआरएम पोर्टल्सचा लाभ घ्यावा.- विकास दिंडोरे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस, सोलापूर ग्रामीण



