सांगोल्यात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूसह ५ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त
किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई, मात्र मुख्य पुरवठादार अद्याप गुलदस्त्यात!

सांगोल्यात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूसह ५ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त
किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई, मात्र मुख्य पुरवठादार अद्याप गुलदस्त्यात!
सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या साठ्यावर सांगोला पोलिसांनी धडक कारवाई केली. अनकढाळ टोल नाक्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत पांढऱ्या रंगाच्या वॅगनार कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला. या कारवाईत अंदाजे ५ लाख २८ हजार २८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणामुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या पुरवठा साखळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री-वितरणावर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनासह सांगोला पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. मात्र, किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होत असताना या प्रतिबंधित मालाचा मोठा साठा सांगोल्यात पोहोचवणारे ‘पुरवठादार’ कोण, हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता सांगोला पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी अनकढाळ टोल नाका परिसरात वाहन तपासणी केली. यावेळी MH 45 AU 1697 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती वॅगनार संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या डिकीत तसेच मधील सीटवर खाकी व पांढऱ्या रंगाच्या गोण्या आढळल्या.
गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. वाहनातील व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपले नाव विजय शशिकांत दौंडे ( रा. कोष्टी गल्ली, सांगोला) असे सांगितले. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गणेश महादेव कदम हे पंचांसह सांगोला पोलीस ठाण्यात उपस्थित झाले. त्यांच्या समक्ष जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची मोजणी करण्यात आली. या संपूर्ण कारवाईतील प्रतिबंधित अन्नपदार्थ व वाहनासह मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ५ लाख २८ हजार २८५ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वाहनाची अंदाजे किंमत ४ लाख रुपये असल्याचेही नमूद आहे.
माल कुठून आला? पुरवठा कोणाला होणार होता?
पोलिसांनी वाहनातील व्यक्तीकडे प्रतिबंधित अन्नपदार्थ कोठून आणण्यात आला, त्याचा पुरवठा कोणाला करण्यात येणार होता तसेच या व्यवहारामागे कोण व्यक्ती आहेत, याबाबत चौकशी केली. मात्र संबंधित व्यक्तीकडून समाधानकारक माहिती मिळाली नसून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ वाहन व साठा जप्त करण्यापुरता मर्यादित न ठेवता प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘मूळ मालक’ आणि ‘पुरवठादार’ कोण?
जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित अन्नपदार्थ नेमका कोणाचा आहे, त्याचा मूळ मालक कोण, त्याचा पुरवठादार कोण आणि या व्यवहारातून आर्थिक लाभ घेणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, याचा सखोल तपास करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, या प्रकरणाच्या तपासातून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होतो का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर अधूनमधून कारवाई होते. काही किरकोळ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. मात्र प्रतिबंधित मालाचा मोठ्या प्रमाणात साठा, वाहतूक आणि वितरण करणारी साखळी कायम सक्रिय कशी राहते? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई सुरू असून, या तपासातून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या पुरवठा साखळीतील प्रमुख सूत्रधार समोर येतात का, याकडे सांगोल्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



