गुन्हेगारी

दुचाकीच्या डिकीतून ८० हजारांची रोकड लंपास!

भरदिवसा हातचलाखी; शेतकऱ्याच्या कष्टाची कमाई अज्ञात चोरट्यांनी पळवली

दुचाकीच्या डिकीतून ८० हजारांची रोकड लंपास!

भरदिवसा हातचलाखी; शेतकऱ्याच्या कष्टाची कमाई अज्ञात चोरट्यांनी पळवली

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेतून काढलेली ८० हजार रुपयांची रोकड दुचाकीच्या डिकीत ठेवून बनियन शिवण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याची नजर चुकवत अज्ञात चोरट्यांनी हातचलाखीने रोकड लंपास केली. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्देश्वर दत्तू चव्हाण (वय ६५, रा. बागलवाडी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. ते शेती व्यवसाय करत असून शेतीसाठी आवश्यक असलेली बियाणे, खते व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, सांगोला शाखेतून ८० हजार रुपये काढले होते. यानंतर त्यांनी ही रक्कम पांढऱ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून आपल्या एमएच-४५ ओ-३०४४ क्रमांकाच्या दुचाकीच्या डिकीत ठेवली. त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात बनियन शिवण्यासाठी थांबले. काही वेळाने परत येऊन डिकी उघडली असता त्यातील पैशांची कॅरीबॅग गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेनंतर त्यांनी परिसरात तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावर शोध घेतला; मात्र रोकड किंवा संशयिताचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर अज्ञात चोरट्याने दुचाकीची डिकी उघडून कॅरीबॅगसह ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची तक्रार त्यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणाचा तपास सांगोला पोलिसांकडून सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांच्या हालचाली आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!