सुनेचा मृतदेह न घेतल्याने जात पंचायतीकडून २० लाखांचा दंड; कुटुंबाला केले समाजातून बहिष्कृत
महुद येथील घटना; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सुनेचा मृतदेह न घेतल्याने जात पंचायतीकडून २० लाखांचा दंड; कुटुंबाला केले समाजातून बहिष्कृत
महुद येथील घटना; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी): सुनेच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी तिचा मृतदेह ताब्यात न घेतल्याच्या कारणावरून जात पंचायतीने २० लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची तक्रार महुद बु. येथील बाळू रामा माने यांनी सांगोला पोलिस ठाण्यात केली आहे. दंडाची रक्कम भरेपर्यंत स्वतःसह कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच मांत्रिकाकडून जादूटोणा करून मानसिक त्रास दिला. याप्रकरणी बाळू रामा माने यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार वामन कोंडीबा माने, सिताराम चिन्नाप्पा निंबाळकर, विजय नारायण निंबाळकर, बाळू भिमराव चव्हाण, दुर्गाप्पा भिमराव चव्हाण, सुखदेव शंकर निंबाळकर, स्वप्निल आव्हाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळू रामा माने यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची सून शारदा २०२० पासून आजारी होती. तिच्यावर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आले. तिच्या माहेरील व्यक्तींचा मांत्रिक स्वप्निल आव्हाडे याच्यावर विश्वास असल्याने फेब्रुवारी २०२२ च्या सुमारास शारदाला धार्मिक विधीसाठी त्याच्याकडे नेण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये शारदाचा आजाराने मृत्यू झाला. शारदाच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेण्याची वेळ आली असता, आपली मानसिक स्थिती ठीक नसल्याने तसेच मुलगा तानाजी हा ऊसतोडीसाठी बाहेर गेल्याने मृतदेह ताब्यात घेतला नाही, असे माने यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, जुलै २०२६ मध्ये त्यांनी सुनेच्या मृत्यूबाबत न्याय मिळावा, अशी मागणी समाजातील व्यक्तींकडे केली. ३० जुलै रोजी सांगोला न्यायालयाच्या मागील बाजूस जात पंचायत भरल्यानंतर सुनेचा मृतदेह अंत्यविधीसाठी घेतला नसल्याच्या कारणावरून सदर पंचांनी बाळू रामा माने यांना २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. जात पंचायतला दंड भरेपर्यंत स्वतः सह कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर महुद येथे जात पंचायत भरवून पोलिस ठाण्यात तक्रार न करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच महुद येथील मरीआई देवीच्या यात्रेदरम्यान मिरवणुकीत सहभागी होऊ दिले नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी बाळू रामा माने यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार वामन कोंडीबा माने, सिताराम चिन्नाप्पा निंबाळकर, विजय नारायण निंबाळकर, बाळू भिमराव चव्हाण, दुर्गाप्पा भिमराव चव्हाण, सुखदेव शंकर निंबाळकर, स्वप्निल आव्हाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



