८१ गावांची जीवनदायिनी शिरभावी योजना आर्थिक अडचणीत; आमदार डॉ.बाबासाहेब देशमुखांच्या पाठपुराव्याने ५ कोटी ४१ लाखांच्या वीज बिलाचा प्रश्न मार्गी
१.६३ कोटींची ग्रामपंचायती व संस्थांकडील थकबाकी; २० गावांना पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू

८१ गावांची जीवनदायिनी शिरभावी योजना आर्थिक अडचणीत; आमदार डॉ.बाबासाहेब देशमुखांच्या पाठपुराव्याने ५ कोटी ४१ लाखांच्या वीज बिलाचा प्रश्न मार्गी
१.६३ कोटींची ग्रामपंचायती व संस्थांकडील थकबाकी; २० गावांना पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील ८२ गावांना वर्षभर अखंडित पाणीपुरवठा करणारी आणि तालुक्याची ‘जीवनदायिनी’ म्हणून ओळखली जाणारी शिरभावी पाणीपुरवठा योजना सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. विविध ग्रामपंचायती, गावांमधील थकबाकीदार ग्राहक व संस्थांकडील तब्बल १ कोटी ६३ लाख ६३ हजार ८१५ रुपयांची थकबाकी असल्याने योजनेच्या देखभाल, दुरुस्ती व नियमित खर्चावर मोठा ताण निर्माण झाला आहे. मात्र, योजनेची तब्बल ५ कोटी ४१ लाख रुपयांची विजेची थकबाकी शासनाकडून भरून घेण्यात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना यश आल्याने पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू झाला आहे.
ऐन उन्हाळ्यातही वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका अशी सांगोल्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या ओळखीमागे शिरभावी पाणीपुरवठा योजनेचे मोठे योगदान आहे. शिरभावीसह तालुक्यातील ८१ गावांना वर्षभर पाणीपुरवठा करणारी ही योजना राज्यातील आदर्श योजनांपैकी एक मानली जाते. मात्र, गावागावांमधील वाढत्या थकबाकीमुळे योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनास मोठा फटका बसत आहे.योथकडील विविध गावांकडून १ कोटी ४९ लाख ६३ हजार ५०६ रुपये, तर विविध संस्थांकडून १४ लाख ३२० रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे एकूण थकबाकी १ कोटी ६३ लाख ६३ हजार ८१५ रुपये इतकी झाली आहे. या वाढत्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजनेच्या दैनंदिन खर्चासह दुरुस्ती व देखभाल कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ लागले होते.
दरम्यान, योजनेची ५ कोटी ४१ लाख रुपयांची विजेची थकबाकी मोठे संकट ठरत होती. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्रीस्तरावर पाठपुरावा करून शासनाकडून ही रक्कम मंजूर करून घेतल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका टळला. शासनाने थकबाकी भरल्यानंतर पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरळीत सुरू झाली असून तालुक्यातील अनेक गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या पाणीपुरवठ्याची मागणी केलेल्या २२ गावांपैकी २० गावांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून उर्वरित गावांमध्येही चाचणी व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची चाचणी पूर्ण झाल्यानंतर मागणीनुसार प्रत्येक तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पाणीपुरवठा मागणी करणाऱ्या गावांची नावे – मंगेवाडी, गायगव्हाण, आलेगाव, आगलावेवाडी, गोडसेवाडी, देवळे, राजापूर, शिवणे, वाकी (शि), अचकदाणी, सोनलवाडी, संगेवाडी, डोंगरगाव, मानेगाव, तरंगेवाडी, मेडशिंगी, बुरलेवाडी, वाकी (घे), वझरे, घेरडी, मेथवडे (माळीवस्ती) व एखतपूर या गावांनी पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. यापैकी तरंगेवाडी व वझरे येथे लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शिरभावी पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणाला वेग – शिरभावी पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणाची कामे २७ जुलै २०२४ पासून सुरू असून यासाठी शासनाकडून सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. योजनेअंतर्गत ६०० किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनपैकी सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सध्या विविध भागांत चाचण्या सुरू आहेत. योजनेची कामे अंतिम टप्प्यात पोहोचल्याने लवकरच अधिक प्रभावी पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुखांच्या प्रयत्नातून विजेची साडेपाच कोटींची थकबाकी भरली – ग्रामपंचायती व विविध संस्थांकडील थकबाकीमुळे योजना अडचणीत सापडली असतानाच विजेची तब्बल ५ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकीही मोठा प्रश्न बनली होती. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून ही रक्कम शासनाकडून भरून घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका टळून योजना पुन्हा कार्यान्वित झाली असून सध्या मागणी असलेल्या गावांना नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
शिरभावी पाणीपुरवठा योजनेची ५ कोटी ४१ लाख रुपयांची विजेची थकबाकी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नातून शासनाने भरल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. सध्या मागणी केलेल्या २२ गावांपैकी २० गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. उर्वरित गावांनाही तीन ते चार दिवसांत नियमित पाणीपुरवठा केला जाईल. मात्र, थकबाकीदार गावांनी त्वरित थकबाकी भरून सहकार्य करावे : संजयकुमार स्वामी, उपअभियंता, शिरभावी पाणीपुरवठा योजना.



