“आठ दिवसांत भारनियमन कमी करा; अन्यथा महावितरण कार्यालयांना टाळे!”
दिपकआबा साळुंखे पाटील यांचा प्रशासनाला इशारा; पाणीटंचाई, वीज संकटावर आक्रमक भूमिका

“आठ दिवसांत भारनियमन कमी करा; अन्यथा महावितरण कार्यालयांना टाळे!”
दिपकआबा साळुंखे पाटील यांचा प्रशासनाला इशारा; पाणीटंचाई, वीज संकटावर आक्रमक भूमिका
वाढत्या भारनियमनामुळे शेतकरी, पशुपालक आणि विद्यार्थी हैराण; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना मुक्त अधिकार
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात वाढत्या भारनियमनामुळे शेतकरी, पशुपालक आणि विद्यार्थ्यांचे जीवन विस्कळीत झाले असून जनतेच्या सहनशीलतेचा अंत होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरण प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “आठ दिवसांत भारनियमन कमी झाले नाही तर महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकू आणि अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरकू देणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी कार्यकर्ता आढावा बैठकीत दिला.
सांगोला येथील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत तालुक्यातील वाढते भारनियमन, भीषण पाणीटंचाई, शेतीसमोरील संकटे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड पंचायत समिती सभापती पुनम इंगवले यांच्यासह तानाजीकाका पाटील, अनिल खटकाळे, मधुकर बनसोडे, नगरसेवक गणेश बनकर, सखाराम तंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम बाबर, अरुणभाऊ घुले, डॉ.सुदर्शन इंगवले, दिलीप नागणे, चंद्रकांत कारंडे, विजयकुमार शिंदे, चंद्रकांत चौगुले, समीर पाटील, विजय येलपले, डॉ.राज मिसाळ, संतोष पाटील, अनिल खडतरे, सचिन लोखंडे, शिवाजीनाना बनकर, विजय पवार यांच्यासह दीपकआबा साळुंखे पाटील गटाचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना दिपकआबा म्हणाले की, टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मिळाले मात्र, कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने टेंभूचे पाणी सोडण्यात अडचणी निर्माण झाल्या. कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी कामाला लागावे. भविष्यकाळाच्या राजकारणासाठी कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पराभवाने खचून जाणारा मी नेता नाही. यापुढे दक्ष राहून राजकारण करण्यासाठी तयार असून पुढील राजकारणाची दिशा ठरवणार आहे. तालुक्यातील वाढत्या भारनियमनामुळे शेतातील पिके व फळबागा करपण्याच्या मार्गावर आहेत. जनावरांचे दूध काढण्याच्या वेळेत वीज नसल्याने पशुपालकांना हाताने धारा काढाव्या लागत असून त्याचा परिणाम थेट दूध उत्पादनावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही गंभीर परिणाम होत असल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. टेंभू, म्हैसाळ आणि नीरा उजवा कालव्याचे पाणी काही प्रमाणात मिळाले असले तरी कोयना धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे भविष्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आवश्यकता निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
पराभवाने खचणार नाही; पुढील राजकीय दिशा लवकरच
“पराभवाने खचून जाणारा मी नेता नाही. आगामी काळात अधिक दक्षतेने राजकारण करत पुढील वाटचालीची दिशा निश्चित करणार आहे,” असे स्पष्ट करत दिपकआबांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी गावागावातील स्थानिक समीकरणांचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

जयमालाताई गायकवाड यांनीही तालुक्यातील वीज व पाणी प्रश्न गंभीर असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करावे, असे आवाहन केले.
महावितरणला आठ दिवसांचा अल्टिमेटम
येणाऱ्या सोमवारी संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन देऊन वाढते भारनियमन कमी करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकारआगामी ग्रामपंचायत निवडणुकीत गावागावातील स्थानिक परिस्थितीनुसार उमेदवार निवडणे, आघाड्या ठरवणे आणि निवडणूक रणनीती आखण्याचे संपूर्ण अधिकार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना दिले.
या बैठकीला सांगोला शहर व तालुक्यातील आबा समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता बैठकीचे रूपांतर जाहीर सभेत झाल्याचे चित्र दिसून आले. सांगोला तालुक्यातील वीज आणि पाणी प्रश्नावर दिपकआबा साळुंखे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापले असून, महावितरण प्रशासन पुढील आठ दिवसांत काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे



