गुन्हेगारी

सांगोल्यातील कृषी साहित्य दुकान फोडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

अज्ञात चोरट्यांचा धाडसी डाव; सर्व्हिस केबल, डीव्हीआरसह रोख रक्कमही चोरी

सांगोल्यातील कृषी साहित्य दुकान फोडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

अज्ञात चोरट्यांचा धाडसी डाव; सर्व्हिस केबल, डीव्हीआरसह रोख रक्कमही चोरी

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील सांगोला-वाढेगाव रोड परिसरात असलेल्या कृषी साहित्य व इलेक्ट्रिक मोटार पंप विक्रीच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी डाव साधत तब्बल ३ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुकानाच्या पाठीमागील पत्रा कापून आत प्रवेश करत चोरट्यांनी ही चोरी केल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत संतोष दत्तात्रय पाटील (वय ४७, रा. राजापूर, ता. सांगोला) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पाटील हे सांगोला-वाढेगाव रोडवरील विजय सुरवसे यांच्या मोकळ्या जागेत पत्राशेड उभारून “कृष्णा कृषी उद्योग” या नावाने इलेक्ट्रिक मोटार पंप, सबमर्सिबल पंप व कॉपर केबल विक्रीचा व्यवसाय करतात.

फिर्यादीनुसार, संतोष पाटील हे दि. २२ मे रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. त्यानंतर २४ मे रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेला पत्रा कापल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून आतील साहित्य अस्ताव्यस्त टाकत मोठ्या प्रमाणात केबल व इतर साहित्य चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या सबमर्सिबल केबलचे बंडल, डीव्हीआर आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरून नेला. चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये ४ एमएम आणि २.५ एमएम क्षमतेच्या विविध कंपन्यांच्या केबलचा समावेश असून, त्याची किंमत लाखोंमध्ये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अज्ञात चोरट्याने १ लाख ३२ हजार रुपये किमतीची ४ एमएम सबमर्सिबल केबल, ६६ हजार रुपये किमतीची ४ एमएम केबल, सुमारे १ लाखांहून अधिक किमतीच्या इतर विविध कंपन्यांच्या केबल, ७ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर, ५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४६ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, दुकानाच्या पाठीमागील बाजूस पत्रा कापून चोरी करण्यात आल्याने चोरट्यांनी पूर्वनियोजन करून हा डाव साधल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!