सांगोल्यात ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल; प्रभाग रचनेवर ३८ हरकती
मुदत संपलेल्या, नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम सुरू

सांगोल्यात ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल; प्रभाग रचनेवर ३८ हरकती
मुदत संपलेल्या, नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम सुरू
सांगोला (प्रतिनिधी): जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. तब्बल ६२ ग्रामपंचायतींसाठी प्रारूप प्रभाग रचना (नमुना ‘ब’) जाहीर करण्यात आली असून, या रचनेवर १३ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. सांगोला तालुक्यातून एकूण ३८ हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
सांगोला तालुक्यातील जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम २० फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. अचकदाणी, आगलावेवाडी, अजनाळे, अकोला, आलेगाव, बामणी, भोपसेवाडी, बुद्धेहाळ, बुरंगेवाडी, चोपडी, देवळे, धायटी, डिकसळ, डोंगरगाव, एखतपूर, गायगव्हाण, घेरडी, गौडवाडी, हटकर मंगेवाडी, हलदहिवडी, हंगीरगे, हणमंतगाव, हातीद, इटकी, जवळा, जुजारपूर, जुनोनी, कडलास, कमलापूर, कटफळ, खिलारवाडी, किडबिसरी, कोळे, लक्ष्मीनगर, लोणविरे, लोटेवाडी, महिम, महूद (बु.), मानेगाव, मांजरी, मेडशिंगी, मेथवडे, नराळे, नाझरे, निजामपूर, पाचेगाव (बु.), पारे, राजुरी, संगेवाडी, शिरभावी, सोमेवाडी, तरंगेवाडी, तीप्पेहळी, उदनवाडी, वझरे, शिवणे, वाकी घेरडी, वाणी चिंचाळे, वासूद, वाटंबरे, मंगेवाडी (य.) व बुरलेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
प्रारूप प्रभाग रचना संबंधित तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आली होती. यावर नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत ३८ हरकती व सूचना दाखल केल्या आहेत. या हरकती १६ एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या असून, २१ एप्रिलपर्यंत त्यावर सुनावण्या होणार आहेत. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी सुनावण्या घेऊन २३ एप्रिल रोजी अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी २८ एप्रिलपर्यंत सुधारित प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील. आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
दरम्यान, सरपंच पदांचे आरक्षण यापूर्वीच निश्चित झाल्याने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे गावागावात राजकीय हालचालींना वेग आला असून, एक ते दोन महिन्यात निवडणुकांचा प्रत्यक्ष धुरळा उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हरकतींच्या सुनावण्यांकडे नागरिक व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. या सुनावण्यांनंतरच अंतिम प्रभाग रचनेचे चित्र स्पष्ट होणार असल्याने पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
ग्रामपंचायत प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम
तहसीलदारांनी गावांचे नकाशे अंतिम करणे: २० फेब्रुवारी
प्रारूप प्रभागरचना प्रसिध्दी : ७ एप्रिल
प्रारूप प्रभागरचनेवर हरकतींचा कालावधी : ७ ते १३ एप्रिल
प्रांताधिकाऱ्यांकडे हरकतीवर सुनावणी : २१ एप्रिल
अंतिम प्रभाग रचना प्रसिध्दी: ४ मे



