पीकपेरणी

सोलापूर जिल्ह्यात ४ लाख ८३ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी

मका पेरणीत विक्रमी वाढ; २०३ टक्के लक्ष्यपूर्ती, गहू, हरभरा आणि सूर्यफुलाला चांगला प्रतिसाद

सोलापूर जिल्ह्यात ४ लाख ८३ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी

मका पेरणीत विक्रमी वाढ; २०३ टक्के लक्ष्यपूर्ती, गहू, हरभरा आणि सूर्यफुलाला चांगला प्रतिसाद

सांगोला (प्रतिनिधी): अतिवृष्टी, पूर व उशिरापर्यंत पाऊस पडल्याने जिल्ह्यात ज्वारीचा पेरा सरासरीपेक्षा एक लाख हेक्टरने घटला असून मका व हरभऱ्याची पेरणी जोमात झाली आहे. रब्बी ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे ज्वारीचा पेरा ३० टक्के घटला. याचा थेट परिणाम ताटातील भाकरीवर होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असला तरी शेतकऱ्यांनी हार न मानता रब्बी हंगामात दमदार पुनरागमन केले. जिल्ह्यातील ४ लाख ४३ हजार ०९८ हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी तब्बल ४ लाख ८३ हजार ०९९ हेक्टर, म्हणजेच १०९ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरण्या झाल्या आहेत.

कर्नाटकच्या सीमेवर असणार्‍या सोलापूर जिल्ह्याला निसर्गाचे खूप छान वरदान लाभले आहे. येथील हवामान, माती आणि पर्जन्यमान ज्वारीच्या पिकासाठी अतिशय पोषक मानले जाते. जिल्ह्यातील शेतजमीन ही काळ्या बुक्क्यासारखी आहे. जी पाणी दीर्घकाळ धरून ठेवते. हळूहळू ओलावा देते. शिवाय, पिकांना पोषक घटकांनी समृद्ध करणारी ही जमीन आहे. त्यामुळे प्राधान्याने येथील शेतकरी ज्वारीला प्राधान्य देतो. ज्वारी पिकासाठी अतिशय पोषक, पिके खोलवर वाढण्यासाठी आणि ओलावा टिकवण्यासाठी ही माती अत्यंत योग्य आहे. सोलापुरातील पर्जन्यमान मध्यम ते कमी प्रकारातील आहे. यामुळे शेतजमिनीचा प्रकार हा कोरडवाहू पट्टा मानला जातो. नेमकी हीच बाब सोलापूरच्या ज्वारीसाठी इष्टापत्ती ठरते. येथील कोरड्या हवामानात ज्वारीचे पीक जोमदारपणे वाढते. यंदा सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. प्रचंड महापूर आला. दुष्काळी, कोरडवाहू शेतजमिनी दीर्घकाळ पाण्याखाली राहिल्या. महापूर ओसरल्यावर, पाऊस थांबल्यावरही जवळपास महिनाभर शेतात पाणी टिकून होते.

परंपरेने रब्बी ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापूरमध्ये यंदा ज्वारी पेरणी अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. प्रस्तावित २ लाख ७५ हजार ०८८ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ २ लाख २७ हजार ६२० हेक्टर (८३ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली. अवकाळी पावसामुळे पेरणी लांबल्याने ज्वारीचे क्षेत्र घटले असून शेतकऱ्यांचा कल विविध नवीन पिकांकडे वळताना दिसत आहे. एकंदरीत, नैसर्गिक आपत्ती, यामुळे ज्वारीचा घटलेला पेरा, त्यामुळे आगामी उत्पादनात होणारी घट, या सर्व घटकांचा सुसंगतरीत्या विचार करता याचा थेट परिणाम आपल्या ताटातील भाकरीवर होणार आहे.

गहू, हरभरा आणि सूर्यफुलाला चांगला प्रतिसाद

रब्बीतील इतर प्रमुख पिकांची स्थिती पुढीलप्रमाणे—

गहू : ४८ हजार ०८८ हेक्टर प्रस्तावित; पेरणी ७१ हजार ५२९ हेक्टर (१४९ टक्के)
हरभरा : ७० हजार ७७७ हेक्टर प्रस्तावित; पेरणी ८४ हजार ९०२ हेक्टर (१२० टक्के)
करडई : २ हजार ०१९ हेक्टर
जवस : २५ हेक्टर
तीळ : १६ हेक्टर
सूर्यफूल : १७० हेक्टर

गहू आणि हरभरा या पिकांना शेतकऱ्यांचा लक्षणीय प्रतिसाद मिळताना दिसतो.

मका पेरणीत विक्रमी वाढ; २०३ टक्के लक्ष्यपूर्ती

जिल्ह्यात मका पिकाने यंदा सर्व विक्रम मोडले आहेत. प्रस्तावित ४७ हजार ०१२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत तब्बल ९५ हजार २६४ हेक्टर म्हणजे २०३ टक्के पेरणी झाली आहे. बाजारभावातील स्थिरता, चांगला उत्पादन खर्च–उत्पन्न गुणोत्तर आणि मागणी वाढल्याने शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर मका पिकाकडे वळला आहे.

अवकाळी पावसाच्या अडथळ्यातूनही शेतकऱ्यांची जिद्द कायम

खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि सप्टेंबर– ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही पावसाने व्यत्यय आणल्याने रब्बी पेरण्या उशिरा सुरू झाल्या.
तरीदेखील शेतकऱ्यांनी खचून न जाता पेरणी वेगाने पूर्ण करत जिल्ह्याचे कृषि चक्र पुन्हा सुरळीत केले.

जिल्ह्याचे कृषि चित्र बदलत्या हवामानाचा संकेत

११ तालुक्यांमधील एकत्रित आकडेवारीनुसार जिल्ह्यात रब्बी पेरण्यांचे एकूण १०९ टक्के लक्ष्य पूर्ण झाले आहे.
पिकांच्या विविधतेकडे वाढता कल, बदलत्या हवामानामुळे पीकपद्धतीतील सतत होणारे बदल आणि शाश्वत शेतीची गरज हे सर्व संकेत यंदाच्या रब्बी हंगामातून स्पष्ट दिसतात.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!