राजकीय

महापालिकेनंतर झेडपीवर भाजपची मुसंडी; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

अध्यक्षपद कोणाकडे? उपाध्यक्षपदासाठी अनेक दावेदार; झेडपीत सत्तास्थापनेपूर्वी जोरदार राजकीय हालचाली

महापालिकेनंतर झेडपीवर भाजपची मुसंडी; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

अध्यक्षपद कोणाकडे? उपाध्यक्षपदासाठी अनेक दावेदार; झेडपीत सत्तास्थापनेपूर्वी जोरदार राजकीय हालचाली

सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवत इतिहास रचला आहे. ६८ पैकी ३८ जागांवर विजय मिळवत भाजपने झेडपीवर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या दणदणीत यशानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर. महापालिकेतील दणदणीत यशानंतर झेडपीतही मिळालेल्या या निकालामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगू लागली आहे.

नगरपालिकांमधील काहीशा अपयशानंतर भाजपसमोर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या. मात्र, काटेकोर नियोजन, बूथस्तरावरील मजबूत संघटन आणि प्रचारातील आक्रमक रणनीतीच्या जोरावर भाजपने परिस्थिती आपल्या बाजूने वळवली. महापालिकेत १०२ पैकी तब्बल ८७ जागांवर विजय मिळवत भाजपने एकहाती सत्ता राखली. या विजयात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या समन्वयाची महत्त्वाची भूमिका राहिल्याचे पक्षांतर्गत बोलले जाते.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र समीकरणे तितकी सोपी नव्हती. अकरापैकी सहा आमदार विरोधात असतानाही भाजपने आत्मविश्वासाने मैदान गाठले. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये स्थानिक नेत्यांचा प्रभाव, गटबाजी आणि पारंपरिक राजकीय गणिते यांचा सामना करत भाजपने आघाडी घेतली. अक्कलकोट, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, माढा, दक्षिण सोलापूर, माळशिरस आणि करमाळा या मतदारसंघांत भाजपने ठोस कामगिरी नोंदवली. विशेष म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघात भाजपने सर्वच्या सर्व सहा जागांवर विजय मिळवून आपले बालेकिल्ले अधिक मजबूत केल्याचे चित्र दिसले. अक्कलकोटमध्ये सात, मोहोळमध्ये सहा, मंगळवेढ्यात चार, पंढरपूरमध्ये तीन, माढ्यात चार, दक्षिण सोलापूरमध्ये तीन, माळशिरसमध्ये दोन आणि करमाळ्यात दोन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले.

विशेष म्हणजे सांगोला तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रथमच कमळ फुलले आहे. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या चोपडी जिल्हा परिषद गटात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी आघाडीच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला आहे. या निकालामुळे जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक पकड अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाचा कारभार सांभाळताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यावर जातीने लक्ष केंद्रित केले. विकासकामांचा धडाका, स्थानिक प्रश्नांवरील तत्परता आणि निवडणुकीपूर्वी केलेली मोर्चेबांधणी यांचा फायदा भाजपला झाला. प्रचारसभांमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेली आघाडी, कार्यकर्त्यांशी साधलेला थेट संवाद आणि नेतृत्वातील आत्मविश्वास यामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, झेडपी अध्यक्षपदाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने पुरुष किंवा महिला यापैकी कोणालाही संधी मिळू शकते. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, ज्येष्ठ नेते रामप्पा चिवडशेट्टी आणि बार्शीतील माजी सदस्य मदन दराडे यांच्या पत्नी सौ. भारती दराडे यांची नावे चर्चेत आहेत.
शांभवी कल्याणशेट्टी यांनी चपळगाव गटातून, चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगोला तालुक्यातीलचोपडी जिल्हा परिषद गटातून, रामप्पा चिवडशेट्टी यांनी वळसंग गटातून, तर भारती दराडे यांनी उपळे दुमाला गटातून विजय मिळवला आहे. या सर्व नावांमुळे पक्षात चुरस वाढली असली, तरी अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या बैठकीत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार राम सातपुते, आमदार सुभाष देशमुख आणि शहाजी पवार या नेत्यांच्या चर्चेनंतर अध्यक्षपदाचा मान कोणाच्या गळ्यात पडतो, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महापालिकेनंतर झेडपीत मिळालेल्या या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरल्याची चर्चा रंगत आहे. भाजपच्या या विजयामुळे विरोधकांसमोर आगामी निवडणुकांसाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी होणाऱ्या विशेष सभेच्या तयारीसाठी जिल्हा परिषद प्रशासनही कामाला लागले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपला ऐतिहासिक यश मिळवून देणाऱ्या गोरे यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत त्यांचा शब्द अंतिम ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. झेडपीत सत्ता स्थापन करण्यापूर्वी सुरू असलेली ही रस्सीखेच सोलापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरणार आहे. अध्यक्षपदाचा मान नेमका कोणाच्या गळ्यात पडतो, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!