पद असो वा नसो, शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचीच सेवा; दिपकआबांचा ठाम निर्धार
🔥 दिपकआबांची थेट घोषणा...शेकापसोबत आघाडी, भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत 🔥

पद असो वा नसो, शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचीच सेवा; दिपकआबांचा ठाम निर्धार
🔥 दिपकआबांची थेट घोषणा…शेकापसोबत आघाडी, भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत 🔥
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सत्ता किंवा पदाच्या मागे कधीच लागलो नाही आणि पुढेही लागणार नाही. पद असो किंवा नसो, शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेची निस्वार्थ सेवा करत राहणार, असा ठाम आणि भावनिक निर्धार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी सांगोला येथे आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकाप सोबत आघाडी करून लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केली. या घोषणेमुळे सांगोला तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

कार्यकर्त्यांचा रेकॉर्डब्रेक मेळावा, शहरात ट्रॅफिक जाम
या मेळाव्यास सांगोला शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने सभागृह अपुरे पडले, तर शेकडो कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर बसावे लागले. एकाच वेळी हजारो वाहने शहरात दाखल झाल्याने सांगोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाली होती.
शेकाप–दीपकआबा साळुंखे पाटील गटाची पुन्हा जवळीक
नुकत्याच पार पडलेल्या सांगोला नगरपरिषद निवडणुकीनंतर शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटामधील जुनी आघाडी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. गेली २५ ते ३० वर्षे सांगोला तालुक्यात अबाधित राहिलेली ही आघाडी मध्यंतरी तुटली होती; मात्र पुन्हा एकत्र आल्याने या दोन प्रबळ राजकीय गटांची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

‘जनताच माझे कुटुंब’
पुढे बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, सांगोला तालुक्यातील साळुंखे पाटील परिवारावर प्रेम व विश्वास ठेवणारे तमाम नागरिक म्हणजेच माझे कुटुंब आहे. या कुटुंबाचा प्रमुख म्हणून नेहमीच कुटुंबाच्या हिताचाच निर्णय घेणार आहे. आमच्या हिताचे धडे देण्याची गरज कुणालाही नाही. सध्या कोणत्याही पक्षात नसलो तरी लवकरच कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन अपेक्षित निर्णय घेईन, असे सूचक विधान करत त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले.
राजकीय इशारा आणि थेट आरोप
३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही युती किंवा आघाडीसाठी कुणाच्या दारात गेलो नाही. त्यामुळे कुणी मला वगळून युतीची भाषा करत असेल, तर त्यांचा राजकीय पुनर्जन्म माझ्यामुळेच झाला आहे, हे त्यांनी विसरू नये, असा थेट इशाराही दिपकआबांनी दिला. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका करताना दिपकआबा म्हणाले, ‘बापूंना नेहमी एखाद्याला नादाला लावण्याची सवय आहे. नगरपालिका निवडणुकीपासून विधानसभेपर्यंत अनेकांना त्यांनी नादाला लावले.’ यावेळी त्यांनी शहाजीबापू पाटील यांच्या मुलास कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी केल्यास जिल्हा परिषद सदस्य करण्याची जाहीर ऑफर देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
‘काही दिवसांतच अपेक्षित निर्णय’
भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना दिपकआबा म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे त्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून लवकरच तसाच निर्णय घेतला जाईल. जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता बैठकीला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने हा मेळावा राजकीय शक्तिप्रदर्शन ठरला.



