सामाजिक

वाढत्या भारनियमनाविरोधात दिपकआबांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

आठ दिवसांत प्रश्न निकाली काढा, अन्यथा ‘रस्ता रोको’चा इशारा

वाढत्या भारनियमनाविरोधात दिपकआबांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

आठ दिवसांत प्रश्न निकाली काढा, अन्यथा ‘रस्ता रोको’चा इशारा

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात वाढत्या भारनियमनामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून या प्रश्नावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत थेट महावितरणच्या कार्यालयात धडक मोर्चा काढला. असंख्य कार्यकर्त्यांसह कार्यालयात पोहोचलेल्या दिपकआबांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत, आठ दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास कार्यालयांना टाळे ठोकून रस्ता रोकोसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

यंदा जून महिना अर्धा संपत आला तरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून भूजल पातळी झपाट्याने खालावत आहे. अशा संकटाच्या काळात महावितरणने सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतातील पिके करपत आहेत, तर जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. दूध काढण्याच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित होत असल्याने पशुपालक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी नुकतीच आपल्या संपर्क कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. त्यानुसार सोमवारी तहसीलदार बाळूताई भागवत व महावितरणचे उपअभियंता हणमंत बनसोडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी नागरिकांनी महावितरणच्या शाखा अभियंते, लाईनमन व वायरमन यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी मांडल्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून शेतकरी व नागरिकांच्या फोनला तत्काळ प्रतिसाद द्यावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यावेळी सभापती पुनम इंगवले, तहसीलदार बाळूताई भागवत, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता जाणून घेणार सांगोल्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा

सांगोला येथील महावितरणच्या कार्यालयात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह धडकले. यावेळी दिपकआबांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता साळवे यांच्याशी चर्चा केली. कार्यकारी अभियंता साळवे यांनी सांगोला येऊन येथील शेतकरी आणि दिपकआबांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेणार आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!