अपघातात माय – लेक जागीच ठार; मेहंदी सुकण्याआधीच काळाचा घाला
मंगळवेढा-सांगोला महामार्गावर दुर्घटना : एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर

अपघातात माय – लेक जागीच ठार; मेहंदी सुकण्याआधीच काळाचा घाला
मंगळवेढा-सांगोला महामार्गावर दुर्घटना : एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर
सांगोला (प्रतिनिधी): अवघ्या महिनाभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहितेच्या हातावरील मेहंदी सुकण्याच्या आत तिचे सुखी संसाराचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. हैदराबादहून परत येताना मंगळवेढा-सांगोला महामार्गावर माळवाडी येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात शेणे (ता. वाळवा) येथील सूरज अशोक पाटील (वय ३२) व शारदा अशोक पाटील (वय ५५) या मायलेकाचा मृत्यू झाला. तसेच सूरज यांचे वडील अशोक पाटील, पत्नी नीता पाटील (२८) अपघातात आणि आयुष अंकुश पाटील (८) असे तिघेजण गंभीर जखमी असून जखमींवर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवार, दि. ८ रोजी सायंकाळी ६ वाजता मंगळवेढा ते सांगोला रस्त्यावर घडली. या घटनेमुळे शेणे परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेणे ता.वाळवा येथील रहिवासी असलेले सूरज पाटील हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर व शासकीय कंत्राटदार होते. त्यांचे भाऊ विशाल पाटील हे हैदराबाद येथे नोकरीस आहेत. त्यांना भेटण्यासाठी सूरज पाटील, त्यांचे वडील अशोक पाटील, आई शारदा, पत्नी नीता आणि पुतण्या आयुष असे पाच जण मोटारीतून (क्र. एमएच ५० एमयू ५१२१) हैदराबादला गेले होते. हे सर्वजण सोमवारी शेणे या आपल्या गावी परत येत असताना सायंकाळी सांगोला-मंगळवेढा महामार्गावर मंगळवेढा ओलांडून आंधळगावच्या पुढे माळवाडी येथे चारचाकी (एमएच ५० यू ५१२१) गाडीने जेसीबीला जोरदार धडक दिल्याने गाडीचा चक्काचूर झाला. एकाच कुटुंबातील पाचजण या गाडीतून प्रवास करत होते. सूरज यांचे आई, वडील, पत्नी व पुतण्या असे पाचजण यामध्ये होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-सांगोला दरम्यान आंधळगाव हद्दीत त्यांच्या मोटारीची जेसीबीशी धडक झाली. या अपघातात सूरज यांच्यासह आई शारदा यांचा मृत्यू झाला.
मयत सूरज अशोक पाटील यांचा नीता यांच्याशी नुकताच विवाह झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने मनात साठवत सुरू झालेला जीवनप्रवास काळाने एका क्षणात हिरावून घेतला. लग्नाच्या हळदीचा रंगही फिकट झाला नव्हता, तोच मृत्यूने सूरजला गाठले. नववधूच्या हातातील मेहंदी सुकण्याआधीच तिच्या संसारावर दुःखाचा डोंगर कोसळला. धडकेची तीव्रता एवढी तीव्र होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातावेळी कारमध्ये एकाच कुटुंबातील मायलेकरांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. सुरज यांच्या पत्नी नीता या गंभीर जखमी असून सांगोला येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहे.
पाटील यांच्या गाडीला जोरदार धडक बसल्याने सूरज यांचे वडील अशोक तुकाराम पाटील (वय ६०) व पुतण्या आयुष अंकुश पाटील (८) हे दोघे गाडीच्या दरवाजातून बाहेर फेकले गेल्याने बचावले व पत्नी नीता सूरज पाटील (२८) गाडीच्या मधल्या सीटमध्ये अडकली होती, त्यांनाही सुखरूपपणे बाहेर काढले. मृत सूरज आणि शारदा पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी शेणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.



