शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज तर्फे चिणके येथे श्रमदान शिबिरातून लोकजागृती

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज तर्फे चिणके येथे श्रमदान शिबिरातून लोकजागृती
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील चिणके येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत एक दिवसाच्या श्रमदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचा मुख्य उद्देश गावामध्ये स्वच्छता, आरोग्याचे महत्त्व आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी जनजागृती करणे हा होता.
सदरचे श्रमदान शिबिर हे रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे उपाध्यक्ष महादेव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन चिणके गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, माजी सरपंच तसेच उपाध्यक्ष महादेव गायकवाड व प्राचार्य डॉ. रणजीत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी गावातील संपूर्ण परिसर स्वच्छ केला. त्यांनी गावातील सार्वजनिक स्थळे, जिल्हा परिषद शाळा, व्यायाम शाळा, माणनदीचा काठ आणि सोनारसिद्ध मंदिराच्या परिसराची स्वच्छता केली. श्रमदानासोबतच, विद्यार्थ्यांनी नागरिकांसाठी विशेष जनजागरण कार्यक्रम आणि समुपदेशन सत्रांचे आयोजन केले.
स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना, उत्तम आरोग्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे किती आवश्यक आहे, यावर प्रबोधन करण्यात आले. गाव स्वच्छ असल्यास आरोग्य सुधारते, वैद्यकीय खर्च कमी होतो आणि गावाचे सौंदर्य वाढून पर्यटन, तसेच अन्य व्यवसायांना चालना मिळते, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती होते, हे स्पष्ट करण्यात आले.
या शिबिरात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाचे स्मरण करण्यात आले. तसेच, गांधीजींच्या स्वच्छतेच्या संदेशावर आधारित पथनाट्यांद्वारे गावकरी आणि युवकांमध्ये स्वच्छतेची प्रेरणा निर्माण करण्यात आली. आपल्या मनोगतात महादेव गायकवाड म्हणाले की, शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या या एकत्रित प्रयत्नातून चिणके गावात सकारात्मक लोकचळवळ उभी राहिली. या श्रमदान आणि प्रबोधन शिबिरामुळे केवळ परिसराची स्वच्छता झाली नाही, तर ग्रामीण विकास आणि नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल गावकऱ्यांमध्ये नवी जागरूकता निर्माण झाली. अशा उपक्रमांमुळेच समृद्ध पंचायतराज संकल्पना प्रत्यक्षात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्राचार्य यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे कामकाज व महत्त्व या विषयावर मनोगत व्यक्त केले. याबरोबर काही विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरासाठी प्राचार्य डॉ. रणजीत देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.पी.जी.पवार, सहसमन्वयक पी.बी.गायकवाड, प्रा. आर.व्ही.मिसाळ व राष्ट्रीय सेवा योजनेचे ६० स्वयंसेवक यांच्यासह सरपंच नाथा खंडागळे, उपसरपंच मोहन मिसाळ, माजी सरपंच विनायक मिसाळ, जालिंदर मिसाळ, महादेव माने, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचे श्रमदान शिबिर हे संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.