♟️ निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांना झाली कार्यकर्त्यांची आठवण; सत्तेच्या सारीपटावर मनधरणीचा डाव
उमेदवारी न मिळाल्याची खंत, गटबाजी, श्रेयवादामुळे कार्यकर्ते दुखावले

♟️ निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांना झाली कार्यकर्त्यांची आठवण; सत्तेच्या सारीपटावर मनधरणीचा डाव
उमेदवारी न मिळाल्याची खंत, गटबाजी, श्रेयवादामुळे कार्यकर्ते दुखावले
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. वर्षानुवर्षे संघटना उभी करणारे, गावोगावी पक्ष पोहोचवणारे, संकटात पक्षासाठी ढाल बनणारे कार्यकर्ते आज अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. निवडणूक आली आणि नेत्यांना कार्यकर्त्यांची आठवण झाली असून सत्तेच्या सारीपटावर विजयाचा डाव टाकण्यासाठी आता प्रचारापेक्षा कार्यकर्त्यांची मनधरणी हाच सर्वात मोठा अजेंडा ठरला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर होताच झेंडे, बॅनर, फलक, वाहन फेऱ्या आणि सभांचा धडाका सुरू झाला. उमेदवार आणि नेते जोमात मैदानात उतरले, मात्र प्रचार यंत्रणा अपेक्षित वेग घेत नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसू लागले. कारण प्रचार यंत्रणेचा कणा असलेले कार्यकर्ते काहीसे दूर, काहीसे नाराज आणि काही ठिकाणी पूर्णपणे अलिप्त झाल्याचे वास्तव समोर आले. याच क्षणी नेत्यांना उमगले की कार्यकर्त्यांशिवाय सत्ता जिंकणे केवळ अशक्य आहे.
गेल्या काही वर्षांत अनेक कार्यकर्त्यांना डावलले गेले, दुर्लक्षित केले गेले. निवडणूक नसताना संपर्क तुटला, काम करूनही मान मिळाला नाही, अडचणी मांडल्या तरी ऐकून घेतले गेले नाही अशा तक्रारी आज उघडपणे व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर अचानक सुरू झालेली विचारपूस कार्यकर्त्यांना खटकत असल्याची भावना गावोगावी बोलली जात आहे.
सध्या प्रचार यंत्रणा अक्षरशः धावपळ करत आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बैठकांवर बैठका, फोनाफोनी, वाहनांच्या फेऱ्या सुरू आहेत. प्रत्येक गाव, वाडी-वस्तीवर पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र प्रचाराच्या या धावपळीत नेत्यांसह उमेदवारांची खरी धावपळ कार्यकर्त्यांसाठी सुरू झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी वरिष्ठ नेते, उमेदवार आणि पदाधिकारी स्वतः घरोघरी भेटी देत आहेत. या निवडणुकीत अंतर्गत मतभेदही उफाळून आले आहेत. उमेदवारी न मिळाल्याची खंत, स्थानिक पातळीवरील गटबाजी, श्रेयाच्या लढाया आणि पदांच्या अपेक्षा यामुळे अनेक कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. काही ठिकाणी प्रचारात सहभागी होण्यास स्पष्ट नकार, तर काही ठिकाणी उदासीनता दिसून येत आहे. याचा थेट परिणाम प्रचार यंत्रणेवर झाला असून काही गटांमध्ये उमेदवार अस्वस्थ झाले आहेत.
गावपातळीवर बोलताना कार्यकर्ते स्पष्ट शब्दांत सांगत आहेत की केवळ निवडणुकीपुरते फोन, सभा आणि भेटी नकोत; तर कायमचा संवाद, आपुलकी आणि सन्मान हवा. घोषणांपेक्षा विश्वास महत्त्वाचा आहे, हे या निवडणुकीत प्रकर्षाने पुढे आले आहे. दरम्यान, प्रचारात विकासाचे मुद्दे मांडले जात असले तरी कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. पाणी, रस्ते, वीज, रोजगार, आरोग्य, शिक्षण यावर बोलताना प्रचार व्यासपीठावर आत्मविश्वास दिसतो; मात्र प्रचार मैदानात कार्यकर्त्यांचा उत्साह कमी असल्यास तो आत्मविश्वास पोकळ ठरण्याची भीती नेत्यांसह उमेदवारांना सतावत आहे.
यामुळेच सध्या मनधरणीचा सपाटा सुरू आहे. काही ठिकाणी जुने वाद मिटवले जात आहेत, काही ठिकाणी आश्वासनांची खैरात होत आहे. निवडणूक जवळ येत असताना ही मनधरणी किती खरी आणि किती तात्पुरती आहे, याचा निर्णय कार्यकर्तेच घेणार आहेत.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रत्येक मत, प्रत्येक घर आणि प्रत्येक कार्यकर्ता निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सत्तेच्या सारीपटावर नेते मोठमोठे डाव खेळत असले तरी शेवटचा डाव कार्यकर्त्यांच्या हातात आहे. ते सक्रिय झाले तर विजय जवळ आहे; आणि जर त्यांनी पाठ फिरवली तर सत्ता दूरच राहणार, हे वास्तव आता कोणालाही नाकारता येणार नाही. एकूणच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही निवडणूक केवळ राजकीय सत्तेची लढाई न राहता कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाची, उपेक्षेविरुद्धच्या भावना आणि संघटनात्मक जाणीवेची लढाई बनली आहे. निवडणूक आली म्हणून आठवण काढलेली आपुलकी मतपेटीपर्यंत पोहोचेल की नाही, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.



