जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काँग्रेस ताकदीने लढवणार – डॉ. स्मिता शहापूरकर

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काँग्रेस ताकदीने लढवणार – डॉ. स्मिता शहापूरकर
सांगोला (प्रतिनिधी): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरून सत्ताधाऱ्यांना कडवे आव्हान देणार असल्याचा स्पष्ट निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रभारी डॉ. स्मिता शहापूरकर यांनी व्यक्त केला. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुका काँग्रेस कमिटीची अत्यंत महत्त्वपूर्ण व रणनीतीपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात आवश्यक ते बदल करून तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्यावर भर देण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या अपयशी धोरणांमुळे ग्रामीण भागात वाढलेली नाराजी ही काँग्रेससाठी मोठी संधी असून, ती संघटित शक्तीत रूपांतरित करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. जिल्हा परिषद व पंचायत समिती या ‘मिनी मंत्रालयां’वर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी बूथ ते तालुका स्तरावर काटेकोर नियोजन, सक्षम उमेदवारांची निवड आणि आक्रमक प्रचार यावर एकमत झाले. संघटना मजबूत करण्यासाठी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह नव्या चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस काँग्रेसचे शहराध्यक्ष तोहीद मुल्ला, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष शेखलाल शेख, जयसिंग गडहिरे, सचिन शेंडगे, शिवाजी घाडगे, नितीन जरे, ॲड. स्नेहा इंगवले, रोहिणीताई धोत्रे व सुरेखा जगदाळे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली असून, इच्छुक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तातडीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्याकडे रिक्तसर मागणी अर्ज सादर करून आपली उमेदवारी नोंदवावी, असे स्पष्ट आवाहन तालुकाध्यक्ष अजयसिंह इंगवले यांनी केले आहे.



