राजकीय

सांगोला नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत विकासाचा धडाका; ८७ कोटींच्या रस्त्यांसह उद्यानांना मंजुरी

स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाच्या ठरावाला मंजुरी

सांगोला नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत विकासाचा धडाका; ८७ कोटींच्या रस्त्यांसह उद्यानांना मंजुरी

स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाच्या ठरावाला मंजुरी

सांगोला (प्रतिनिधी): शहराच्या विकासाला वेग देत नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वाच्या कामांना मोठ्या प्रमाणावर मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शहरातील पायाभूत सुविधांवर भर देत तब्बल ८७ कोटी ४८ लाख ८८ हजार रुपयांच्या १३ रस्त्यांच्या विकास कामांना हिरवा कंदील देण्यात आला असून स्व.गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे प्रवक्ते नगरसेवक अरुण पाटील यांनी माहिती दिली.

सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष आनंदा माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, प्रवक्ते नगरसेवक अरुण पाटील, नगरसेवक माऊली तेली, नगरसेवक काशिलिंग गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रवक्ते नगरसेवक अरुण पाटील म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शब्दाप्रमाणे तहसील कार्यालयाजवळ स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकासाठी ३ कोटी रुपयांच्या कामाच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. तसेच विविध समाजाच्या सभागृह बांधकामासाठी पूर्वी मंजूर केलेल्या २० कोटी रुपयांच्या निधीअंतर्गत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला. शहरातील सार्वजनिक सुविधा आणि आरोग्यदायी वातावरणावर लक्ष केंद्रित करत वासुद रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ कराटे-योगा केंद्र विकसित करण्याचा विषय मंजूर झाला. ‘वैशिष्ट्यपूर्ण योजना’ अंतर्गत ‘नमो उद्यान’ उभारण्यासाठी १ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून प्रभाग ८ मधील आरक्षित जागेवर बगीचा विकसित होणार आहे.

वंदे मातरम् चौक येथील आरक्षण क्रमांक ६३ येथील बगीचाला राजे उमाजी नाईक उद्यान व भाजी मंडईला राजे उमाजी नाईक भाजी मंडई असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला अधोरेखित करत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व्हे नंबर १६०८ येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. राजे उमाजी नाईक यांच्या नावाने वंदे मातरम् चौकातील उद्यान व भाजी मंडई नामकरणाचा निर्णय घेण्यात आला. ग्रामदैवत अंबिका मंदिर परिसरात बगीचा व धर्मशाळा उभारण्याचा विषयही मंजूर झाला.

नागरिकांना शास्तीचा कर कमी करण्यासाठी कर अभय योजनेअंतर्गत ठराव करून प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गोशाळेत सोडण्यास मंजुरी देण्यात आली. नगरपालिकेच्या विधीज्ञ पॅनलवर ॲड सुधीर वाघ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निधीतून अयोध्या नगरी येथे महिला सभागृहाचे काम पूर्ण झाले असून या सभागृहाला मा.आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नगराध्यक्ष आनंदा माने म्हणाले, “निधीचा योग्य विनियोग करत नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास साधला जाईल.” सांगोला शहरात वृक्षारोपण मोहिमेला वेग देत ‘हरित सांगोला, स्वच्छ सांगोला’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. नागरिकांना अखंड व दर्जेदार पाणीपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक सुधारणा आणि दुरुस्त्या प्राधान्याने केल्या जातील. भुयारी गटारीची कामे लवकरात लवकर पूर्ण करून स्वच्छता व आरोग्यदृष्ट्या सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या उत्कृष्ट कामांमुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत नगराध्यक्ष आनंदा माने यांनी विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडत हरित, स्वच्छ आणि सुविधायुक्त सांगोला घडविण्याची भूमिका व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!