सामाजिक

आपुलकी प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर; समाजघडविणाऱ्या कर्तृत्वाचा गौरव

आपुलकी प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर; समाजघडविणाऱ्या कर्तृत्वाचा गौरव

सांगोला (प्रतिनिधी): समाजातील विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याची दखल घेत आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे प्रतिष्ठेचे पुरस्कार यंदा जाहीर करण्यात आले आहेत. श्रीमती कृष्णाबाई आगतराव खटकाळे, तानाजी नामदेव सांगोलकर, बसवेश्वर गुंडाप्पा झाडबुके, वैभव विठ्ठल गलांडे तसेच न्यू स्टार गणेश तरुण मंडळ, तिप्पेहळी हे यंदाचे मानकरी ठरले असून त्यांना १ जानेवारी २०२६ रोजी एका विशेष समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव व सचिव संतोष महिमकर यांनी दिली.

पतीच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता आपल्या मुलांना शिक्षण देत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी अथक परिश्रम घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या श्रीमती कृष्णाबाई आगतराव खटकाळे यांना “कृतिशील आदर्श माता पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
बलवडी येथील तानाजी नामदेव सांगोलकर यांनी २० एकर क्षेत्रात ११ हजार डाळिंब झाडांची यशस्वी लागवड करून दरवर्षी भरघोस उत्पादन घेतले आहे. उच्च प्रतीचा डाळिंब उत्पादक शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला असून परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतीत नवे प्रयोग करण्यास प्रवृत्त केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना “सृजनशील शेतकरी पुरस्कार” देण्यात येणार आहे.

व्यसनमुक्ती चळवळ, गोहत्या बंदी आंदोलन, नदी स्वच्छता अभियान अशा विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत वयाच्या एक्काहत्तरीतही तितक्याच उत्साहाने समाजसेवा करणारे मेडशिंगी येथील बसवेश्वर गुंडाप्पा झाडबुके यांना “समाजसेवा प्रेरणा पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
लहान वयात दुर्दैवी अपघातात दोन्ही हात गमावूनही परिस्थितीपुढे न झुकता शिक्षण व आत्मसन्मानाच्या जोरावर जिद्दीने जीवनाचा संघर्ष करणाऱ्या एखतपूर येथील वैभव विठ्ठल गलांडे यांना “सार्थ स्वाभिमान पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे.

तिप्पेहळी येथील सातकी वस्तीतील न्यू स्टार गणेश तरुण मंडळ यांनी गणेशोत्सवातून उरलेल्या निधीतून शाळेसाठी जागा उपलब्ध करून सुसज्ज शैक्षणिक इमारत उभी केली. त्यासोबतच धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम—रक्तदान शिबिरे, गरजूंना मदत, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण—राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उल्लेखनीय कार्यासाठी मंडळास “आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.

या सर्व पुरस्कारांचे वितरण आपुलकी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनी, १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, सदानंद मल्टिपर्पज हॉल, मिरज रोड, सांगोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून या समारंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यादव व महिमकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!