निवडणुकीची वारी, सरसावले कारभारी..!
इच्छुकांची भाऊगर्दी, भेटीगाठीवर जोर, कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन् रामराम..!

निवडणुकीची वारी, सरसावले कारभारी..!
इच्छुकांची भाऊगर्दी, भेटीगाठीवर जोर, कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन् रामराम..!
सांगोला (दिलीप घुले): आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह दुसऱ्या फळीतील नेत्यांची राजकारणात प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने गावोगावी तगडी फाइट रंगणार असून, वातावरण आतापासूनच टाइट झाल्याचे दिसून येत आहे. सत्तेचे गणित सोडविताना उमेदवारीचा प्रश्न जटिल होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

निवडणुकीची रणधुमाळी अद्यापही दूर असतानाही इच्छुकांनी आतापासून प्रचाराचा धडाका लावला आहे. कडक इस्त्री केलेले कपडे घालून नेते मतदारांना नमस्कार, रामराम ठोकून मिरवू लागले आहेत. मी मिरवणार अन् सगळ्यांची जिरवणार’ जणू काही असा विश्वास त्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसून येत आहे. एकूणच शहरासह गावागावांत राजकीय वातावरण तापत चालले आहे.
मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीचा उत्साह सांगोला शहरासह खेड्यापाड्यात दिसून येऊ लागला आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंव्हाही जाहीर होऊ शकतो. पाच वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र नांदणाऱ्या मित्र, आप्तेष्ट आणि भावाबंधातच नव्हे, तर घराघरात पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने आपुलकीपेक्षा अधिक कटुतेची भावना निर्माण होऊ लागल्याचे चित्र गावगाड्यात दिसून येऊ लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटलं की, गावात कुठं फाईट तर कुठं वातावरण टाईट अशी स्थिती निर्माण होते. नेत्यांसाठी ग्रामीण भागातील निवडणूक ही सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाते. आता तर राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुका चुरशीच्या होणार हे निश्चित झाले आहे.
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. त्यात बाजी मारण्यासाठी सांगोल्याच्या राजकारणात दिग्गज मानल्या जाणाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून आतापासून मतदारांच्या भेटीला सुरुवात केली आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवित आम्हीच खरे जनसेवक असल्याचे दाखवून देत आहेत. निवडणुका कधीही जाहीर होऊ द्या, उमेदवारी मिळो अथवा न मिळो शक्तिप्रदर्शन करण्यासोबतच आता इच्छुकांनी मतदारांच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. माणसांचे चारित्र्य, आर्थिक परिस्थिती, समाजात पत आपल्या अडीअडचणी कोण कामाला येतात, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असुन कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाचे तिकीट कट होणार, अटीतटीची लढत कधी होणार याविषयीच्या चर्चा रंगत आहे.


