कृषी सल्ला

शेतकऱ्यांनो आनंदाची बातमी! २० सप्टेंबरपर्यंत करा ई-पीक पाहणी नोंदणी

शेतकऱ्यांनो आनंदाची बातमी! २० सप्टेंबरपर्यंत करा ई-पीक पाहणी नोंदणी

 

सांगोला (प्रतिनिधी): राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ई-पीक पाहणीची अंतिम मुदत आता २० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. खरीप पिकांच्या नोंदणीसाठी शेतकरी स्तरावर एक ऑगस्ट ते १४ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांची नोंदणी केलेली नव्हती. राज्यात सरासरी ४० टक्के पिकांची नोंदणी झाली असल्याने सरकारने आता २० सप्टेंबरपर्यंत करा ई-पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.


खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीकपाहणीची मुदत १४ सप्टेंबर असून अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करता आलेली नाही. काही ठिकाणी दुबार पेरणीही झाली आहे. त्यामुळे या ई-पीक पाहणीला सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत आता २० सप्टेंबर अशी करण्यात आली आहे. त्यानंतर सहायकांमार्फत नोंदणी केली जाणार आहे. राज्यातील एकूण पीक क्षेत्राच्या सुमारे ४० टक्के अर्थात ६७ लाख १९ हजार हेक्टर झाली आहे.

दरम्यान राज्यात शनिवारपर्यंत एकूण ६७ लाख १९ हजार ६५२ हेक्टरवरील खरीप आणि बहुवर्षीय पिकांची नोंदणी झाली होती. त्यात ३० लाख हेक्टर सोयाबीन पिकाची नोंदणी झाली आहे. राज्यात २०१९ पूर्वी खरीपातील सरासरी पेरणी क्षेत्र १ कोटी ६९ लाख २२ हजार ९६७ हेक्टर इतके आहे. त्यानुसार नोंदणी केलेले क्षेत्र ३९.७१ टक्के आहे. ई-पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी ऑनलाइन करणे. ही प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे केली जाते, जिथे शेतकरी त्यांच्या पिकांचा फोटो अपलोड करून त्यांची माहिती सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवतात. यामुळे, शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणे सोपे होते.
अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे वेळेत ई-पीक पाहणी पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे, अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांकडून मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. या वाढीव मुदतीमुळे, आता ज्या शेतकऱ्यांची नोंदणी राहिली आहे, त्यांना २० सप्टेंबरपर्यंत ती पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. या मुदतवाढीचा फायदा घेऊन, सर्व शेतकऱ्यांनी वेळेत आपली नोंदणी पूर्ण करावी आणि सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जर तुम्ही अद्याप ई-पीक पाहणी केली नसेल, तर लगेच तुमच्या स्मार्टफोनवर ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही तुमच्या शेतातील पिकांची नोंदणी सहज करू शकता.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!