शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘इंडक्शन प्रोग्राम’ संपन्न

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘इंडक्शन प्रोग्राम’ संपन्न
सांगोला: रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते.
कॉलेजच्या प्राचार्यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यांनी नवीन विद्यार्थ्यांना कॉलेजचे नियम आणि उपलब्ध सुविधांची सविस्तर माहिती दिली, जेणेकरून विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वातावरणाशी जुळवून घेणे सोपे जाईल. या प्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना कॉलेजची कार्यपद्धती, शैक्षणिक परंपरा तसेच त्यांनी मागील पंधरा वर्षांतील कॉलेजचा लेखाजोखा मांडत संस्थेची शैक्षणिक प्रगती, प्रकल्प स्पर्धांमधील यश, विद्यार्थ्यांचे रोजगार व उच्चशिक्षणातील यशस्वी प्रयत्न अशा अनेक उपलब्धींचा आढावा घेतला.
यानंतर प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना कॉलेजची स्थापना व तिच्यामागील उद्देश याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक केंद्र अशा विविध सुविधा,तसेच कॉलेजचे नियम व शिस्त यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचे अकॅडमिक कॅलेंडर कशा पद्धतीने राबवले जाते याची सविस्तर माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE), तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) या संस्थांची रचना, भूमिका व कार्यपद्धती याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य यांनी कॉलेजमधील विविध समित्यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांसमोर ठेवली. यामध्ये विशेषत: तक्रार निवारण समिती, अँटी रॅगिंग समिती, इंटरनल कंप्लेंट कमिटी तसेच SC-ST समिती यांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व वैयक्तिक विकासाशी निगडित उपक्रम राबविण्यासाठी या सर्व समित्या सातत्याने कार्यरत असल्याचे प्राचार्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. इंडक्शन प्रोग्रॅममुळे विद्यार्थ्यांना नवीन वातावरणाची ओळख तर झालीच, शिवाय आत्मविश्वासाने शैक्षणिक प्रवास सुरू करण्याची ऊर्जा मिळाली. कार्यक्रमाचा शेवट हा प्रथम वर्ष विभागाच्या विभाग प्रमुखांच्या आभार प्रदर्शनाने झाला. संस्थाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.



