ऑगस्ट महिन्यात अळी, किडींपासून पिकांचे संरक्षण..!

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. तेव्हा शेतात जी पिके उभी आहेत त्यांची वाढ व निकोपतेसाठी शेतकऱ्यांना कसोशीने लक्ष द्यावे लागणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांच्या वाढीबरोबरच कीड व अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना नियोजनही करावे लागणार आहे. कापूस पिकावर होणारा फुलकीडे व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव तसेच सोयाबीन, तूर व कापूस पिकांवर दिसून येणाऱ्या हुमणी अळीच्या धोक्यापासून रक्षण करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने शेतकरी बांधवांना खास सल्ला दिला आहे.
फुलकिडे, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव
कापूस पिकावर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येणाऱ्या तुडतुड्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. जुलै शेवटच्या आठवड्यापासून तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून फुलकीड्यांचा व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने एकीकृत व्यवस्थापनांतर्गत रस शोषक किडींचे व गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे बहुभक्षीय हुमणी अळीपासून (होलोट्रीचीया प्रजाती) नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून किड व्यवस्थापनाचा सल्ला देण्यात आला आहे.
सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे नुकसान
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो. तसेच हुमणी अळी (होलोट्रीचीया प्रजाती) ही एक बहुभक्षी कीड असून महाराष्ट्रामध्ये होलोट्रीचीया सेरेंटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे नुकसान होते. या सर्व प्रकारच्या किडींच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मावा, तुडतुडे, फुलकिडे नियंत्रण फवारणी
मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेझीन 25 टक्के प्रवाही 20 मि.ली. किंवा फिप्रोनील 5 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मि.ली. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हुमणी अळीच्या प्रादुर्भावापासून रक्षण
सोयाबीन, कापूस, तूर पीकांचे बहुभक्षीय हुमणी अळीपासून (होलोट्रीचीया प्रजाती) नुकसान टाळण्यासाठी सातत्याने ही किड येणाऱ्या भागात बाभुळ, कडूलिंब आणि बोर यासारख्या झाडांवर किटकनाशकाची पहिली फवारणी करावी. किटकनाशकांचा वापर करतांना मजुरांना संरक्षण साधने पुरवावीत. गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 3 आठवड्यांनी करावी.
ज्वारी, बाजरी, मका, भात, गव्हाला हुमणीचा धोका
हुमणी अळी पाऊस पडल्यानंतर जमिनीत अंडी देते. ज्वारी, बाजरी, मका, भात, गहू, ऊस, मिरची, मूग, करडई, वांगी, कापूस आणि सुर्यफूल आदी पिकांची मुळे ही अळी फस्त करते. याकारणाने पिके उन्मळून जमिनीवर कोलमडून पडतात. या किडीचा सौम्य प्रादुर्भाव तुरळक ठिकाणीच असल्यास जैविक मित्र बुरशी मेटॅरायझियम 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी करावी किंवा मेटॅरायझियम 1 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी शेतात फेकावे. मित्र बुरशीचा वापर करतांना ओलावा असणे आवश्यक असते.
मिरची, मूग, करडई, वांगी, सुर्यफूलावरील हुमणी नियंत्रण
लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरिता फिप्रोनील 40 टक्के इमिडॅक्लोप्रिड 40 टक्के दानेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडांजवळ टाकावे किंवा कार्बोफ्यूरॉन 3 टक्के दानेदार 33.30 किलो किंवा थायोमेथोक्झाम 0.4 टक्के बायफेनथ्रिन 0.8 टक्के दानेदार 12 किलो प्रति हेक्टर किंवा थायोमेथोक्झाम 0.9 टक्के फिप्रोनिल 2 टक्के दानेदार 12 ते 15 किलो प्रति हेक्टर खोडांजवळ जमिनीत ओलावा असतांना मातीत मिसळून द्यावे, असा मोलाचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस, तूर, मूग, उडीद, मका व भूईमूग पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. साचलेले पाणी तातडीने निचरा करून टाकावा. फवारणीची कामे पावसामुळे किमान २ दिवस पुढे ढकलावीत.
फळबाग व्यवस्थापन
केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. रोगट झाडांवर योग्य औषधांची आळवणी करावी.
भाजीपाला
पिकात पाणी साचू देऊ नये. काढणीस तयार असलेल्या भाज्या वेळेत काढून घ्याव्यात.
फुलशेती
फुलपिकात अतिरिक्त पाणी न साचता निचऱ्याची सोय करावी. तयार फुलांची वेळेवर काढणी करावी.
पशुधन व्यवस्थापन
गोठे हवेशीर व कोरडे ठेवावेत. पावसाचे पाणी शेडजवळ साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. कुक्कुटपालन शेडमध्ये स्वच्छ पाणी व योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. दर १५ दिवसांनी गोठ्याचे निर्जंतुकीकरण (पोटॅशियम परमॅंगनेट) करावे. माशा व कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छता राखावी. शेतकरी बांधवांनो, या काळात पिके व जनावरांमध्ये अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. फवारणी व खत व्यवस्थापन पावसाच्या उघडीपीनंतर करावे