उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा…

शेतीत वर्षभर काम करणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या लाडक्या बैलाला सन्मान देतात आणि त्याला कामापासून पूर्णपणे आराम देतात.
शेतीत आधुनिकीकरण आल्यानंतर बैल बारदाणांची संख्या कमी होत असून बहुतांश शेतकर्यांकडील बैलजोडी नाहीशी झाली आहे. आता बैलांविनाच बैलपोळा साजरा करण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. शेतकर्यांचे सर्जा-राजा म्हणून ओळखल्या जाणार्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण आहे.
पूर्वी मोठ्या गावात जवळपास सर्वच शेतकर्यांकडे बैलजोडी असायची. मोठ्या गावात एखाद्या-दुसर्या शेतकर्याकडेच बैलजोडी राहिल्या आहेत. आता बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. ज्यांच्याकडे जमीन, त्यांच्याकडे बैलजोडी हे समीकरण ठरलेले असायचे. आता शेतीकामासाठी शेतकर्यांच्या दारासमोर ट्रॅक्टर उभे आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी बैलपोळ्याचे महत्त्व अजूनही कायम आहे. शेतकर्यांसोबत वर्षभर शेतात राबणार्या बैलांचा एकमेव सण पोळा भाद्रपद महिन्यात अमावास्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो.
बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेले झूल, पिवळ्या, गुलाबी, हिरव्या रंगांनी सजविले जाते. शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा लावतात. नवा कोरा पांढरा शुभ्र कासरा अडकवून जोडीला लाल लोकरीचे गोंडे, नवीन घुंगरमाळा, कवड्यांचे हार, नवीन रंगीबेरंगी चित्रांच्या झुली दुपारी यांच्या अंगावर चढतात. पैंजण, पट्टे, झेंडूचे हार अशी सामग्री वाट पाहत राहते. पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दाखविला जातो. प्रत्येक शेतकरी बैलाला सजवितो. त्यांची मिरवणूक काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधील प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. सांयकाळी बैल पळविण्याची प्रथा आजही आहे.
सोलापूर शहर, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या कर्नाटकच्या सीमावर्ती भागाला लागून असलेल्या भागात वटपौर्णिमेच्या दिवशी बैलपोळा अर्थात कारहुणवी साजरी केली जाते, तर महाराष्ट्रात पिठोरी अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. यंदाच्या मोसमात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पशुधनांसाठी मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. पेरणीयोग्य, पिकांना पोषक, वेळेवर अपेक्षित पाऊस झाल्याने बळीराजा खूश असून बैलपोळा सणाला खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे.
पोळ्याच्या दिवशी सगळं शिवार, वाड्यावस्त्या, कुळा-कुळातले बापजादे सगळे मिळून या बळीराजाच्या पोशिंद्याच्या पायी नतमस्तक होऊन त्याची पूजा करतात. बैलजोडी हीच बळीराजाची खरी दौलत आहे. खरं तर शेती हे या मुक्या जीवाचं समर्पण आहे अन् पोळा हा त्या ऋणातून उतराई होण्याचा मनुष्यप्राण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.