सोलापूर जिल्ह्यातील आठ मंडलांत ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यातील आठ मंडलांत ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन तालुक्यांतील ८ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. या मंडलासह जिल्ह्यातील अन्य भागांत झालेल्या पावसामुळे आतापर्यंत ४१ हजार हेक्टरवरील सोयाबीन, तूर, उडीद, मक्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
अतिवृष्टिग्रस्त ८ मंडलांतील पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भागात कृषी व महसूल विभागाकडून पंचनामे केले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात १ ते १८ ऑगस्ट अखेर सरासरी २७६.२ मिमी पाऊस पडला असून सोलापूर जिल्ह्यातील शेतीची वाटचाल ओल्या दुष्काळकडे सुरुवात झाली असल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात एप्रिल ते मे दरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातले. यामध्ये फळबाग द्राक्षे, केळी यासह फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यात यंदा साडेचार लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यापैकी ४१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील ८ मंडलांतील ८८ गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नुकसानग्रस्त सोयाबीन, तूर, मुग,उडीद,मका, भाजीपाला, फळपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस दक्षिण सोलापूरमध्ये ४४२ मिमी तर पंढरपूरमध्ये सर्वात कमी पाऊस पडला आहे. अतिवृष्टी झाल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. येत्या काही दिवसात पावसाने विश्रांती घेतली नाही तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाने एकूण सरासरी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल विभागास जागेवर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बोरामणी मंडलात सर्वाधिक ३०० मि.मी. पेक्षा तर इतर नऊ मंडलात दोनशे मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडला असताना करमाळा, पंढरपूरसह इतर तालुक्यातील ३४ मंडलात शंभर मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे. बोरामणी मंडलात सर्वाधिक ३०७ मि.मि. तर मार्डी मंडलात २९१ मि.मी., मुस्ती मंडळात २८१ मि.मी. पाऊस पडला आहे. शेळगी, वडाळा, सोलापूर, निंबर्गी, वैराग, किणी व नरखेड मंडळात दोनशे मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडला आहे.
मरवडे, मारापूर, मंगळवेढा, भोसे, हुलजंती, बोराळे, पिलीव, महाळुंग, लवंग, अकलूज, नातेपुते, दहिगाव, सदाशिवनगर, माळशिरस, संगेवाडी, कासेगाव, तुंगत, चळे, पाटकूल, करकंब, भंडीशेगाव, पंढरपूर, केत्तुर, उमरड, कोर्टी, सालसे, जेऊर, केम, करमाळा, अर्जुननगर, रांझणी, वाघोली, तडवळ आदी ३४ मंडलात शंभर मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे.