गुन्हेगारी

तडवळ स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसवर मध्यरात्री दरोडा

महिलांचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लुटले, दगडफेकीत प्रवासी जखमी

तडवळ स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसवर मध्यरात्री दरोडा

महिलांचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लुटले, दगडफेकीत प्रवासी जखमी

सांगोला (प्रतिनिधी) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर शनिवारी पहाटे घडलेल्या एका थरारक घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तब्बल ७४ मिनिटे उभी असलेल्या यशवंतपूर– बिकानेर एक्स्प्रेसवर ४ ते ५ अज्ञात दरोडेखोरांनी नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला चढवत प्रवाशांना मारहाण केली आणि महिलांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल तसेच इतर मौल्यवान साहित्य लुटून पसार झाले. दरोडेखोरांनी विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक केल्याने एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंतपूर–बिकानेर एक्स्प्रेस शनिवारी पहाटे २.४९ ते ४.०३ या कालावधीत तांत्रिक कारणामुळे अक्कलकोट तालुक्यातील तडवळ रेल्वे स्थानकावर उभी होती. मध्यरात्रीची वेळ आणि बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत ४ ते ५ दरोडेखोरांनी एस-४, एस-६ आणि एस-७ या स्लीपर डब्यांमध्ये प्रवेश केला. काही आरोपी थेट डब्यांमध्ये घुसले, तर काहींनी खिडक्यांमधून हात घालून प्रवाशांच्या गळ्यातील दागिने आणि सामान हिसकावण्यास सुरुवात केली.

प्रवाशांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर बेदम मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आरोपींनी दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात एस-६ डब्यातील सीट क्रमांक ५३ वरून प्रवास करणारे राजस्थानमधील पाली येथील कालूराम भाटी यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या चेहऱ्यावरून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता. गाडी सोलापूर स्थानकावर पोहोचल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले.

या दरोड्यात एस-७ डब्यातून प्रवास करणारे सोलापूर शहरातील पूर्व मंगळवार पेठ येथील महेश पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वजनाची, अंदाजे १ लाख ४३ हजार ५०० रुपयांची सोन्याची चैन दरोडेखोरांनी हिसकावून नेली. याशिवाय अन्य प्रवाशांचे मोबाईल फोन, रोख रक्कम आणि मौल्यवान साहित्यही लुटण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे डब्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि प्रवाशांनी आरडाओरडा करत मदतीची याचना केली.
घटनेची माहिती रेल्वेच्या हेल्पलाइनवर देण्यात आल्यानंतर पहाटे ४.५८ वाजता गाडी सोलापूर स्थानकात दाखल होताच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महेश गोपाळ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक तांबोळी यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळाची पाहणी केली असून तपासाला वेग देण्यात आला आहे. रेल्वे मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, तडवळसह परिसरातील स्थानकांवरील हालचाली, संशयित व्यक्तींची माहिती तसेच दरोडेखोरांनी रेल्वेत नेमका कुठे प्रवेश केला आणि कोणत्या ठिकाणी उतरून पसार झाले, याचा कसून तपास सुरू आहे. रेल्वे सुरक्षेतील संभाव्य त्रुटींचीही चौकशी केली जात आहे

या धक्कादायक घटनेमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील रात्रीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेषतः तांत्रिक कारणांमुळे गाड्या दीर्घकाळ स्थानकांवर उभ्या राहत असल्यास त्या काळात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. प्रत्येक डब्यात नियमित गस्त, संवेदनशील स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा, सीसीटीव्ही देखरेख आणि तातडीच्या प्रतिसादासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून लुटलेला ऐवज हस्तगत करण्यात येईल, असा विश्वास रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच रात्रीच्या प्रवासादरम्यान प्रवाशांनी मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, संशयास्पद हालचाली दिसताच तातडीने रेल्वे हेल्पलाइन किंवा सुरक्षा यंत्रणांना माहिती द्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!