सामाजिक

“भलगडी दादा भलरी, व्हय गड्या…!” भलरीचे सूर हरवले

लोकसंस्कृतीही नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर, ज्वारीचे उत्पादन घटले

“भलगडी दादा भलरी, व्हय गड्या…!” भलरीचे सूर हरवले

लोकसंस्कृतीही नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर, ज्वारीचे उत्पादन घटले

सांगोला (प्रतिनिधी): एकेकाळी ज्वारीच्या काढणीच्या दिवसांत सांगोल्याच्या शिवारात सूरांची उधळण व्हायची…
“व्हय गड्या दादा रे… भल गडी दादा…” या हाकेने रान दुमदुमायचे… थकलेल्या मजुरांच्या हातांना बळ द्यायचे… आणि श्रमाला सणासारखा रंग चढायचा. मात्र आज तेच शिवार ओस पडले आहे. भलरीचे सूर थांबलेत… आणि त्यासोबतच ग्रामीण संस्कृतीचा एक जिवंत अध्यायही हळूहळू मिटत चालला आहे.
सांगोला तालुक्यात ज्वारीच्या क्षेत्रात तब्बल साडेतीन हजार हेक्टरची घट झाली आहे. अतिपावसाचा फटका, मजुरांची कमतरता आणि बदलती पीकपद्धती यामुळे ज्वारी शेती मागे पडली आहे. ज्वारीसोबत जोडलेली सामूहिक काढणी आणि भलरीची परंपरा आता केवळ आठवणींमध्ये उरली आहे.


पूर्वी काढणीच्या वेळी शेतात एक वेगळीच ऊर्जा असायची.
“साळू तिथं बाळू,
चंद्रभागा पाणी तुझं नेवाशाची वाळू,
अभीर बुका घ्या घ्या,
देवाजीच्या दर्शनाला, रस्ता मला द्या द्या”

“आम्ही भाग्याचे रे भाग्याचे,
आमचे तांबे भोपळ्याचे,
लोकाघरी हांडे भांडे रे, लोकाघरी हांडे भांडे,
आमच्या घरी परूळतांबे,
आम्ही भाग्याचे रे भाग्याचे
भलरी दादा, भलरं”

“जनी का मनी,
रंग नाय कालच्यावाणी,
जनी सुकून गेलीय गं,
आळूच्या पानावाणी”

अशा ओव्यांनी श्रमाला गीताची जोड मिळायची. भलरी म्हणजे केवळ गाणे नव्हते, ती शेतकऱ्यांच्या जगण्याची लय होती… थकवा घालवणारी, मनाला उभारी देणारी आणि एकोप्याची वीण घट्ट करणारी परंपरा होती.


गेल्या पाच-सहा वर्षांत पाण्याची उपलब्धता वाढली, सिंचन प्रकल्प उभे राहिले… आणि त्याचवेळी शेतीचे चित्र बदलले. गहू, कांदा, तूर, मका आणि फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल झपाट्याने वाढला. या पिकांना बाजारभाव चांगला, यांत्रिकीकरण सोपे… त्यामुळे ज्वारीकडे पाठ फिरली. ज्वारी पिकासाठी लागणारी मेहनत आणि मिळणारा मोबदला यातील तफावत वाढत गेली. काढणीसाठी मजूर मिळेनासे झाले. परिणामी सामूहिक काढणीची परंपरा मोडली… आणि भलरीचे सूरही आपोआप थांबले.

आज ज्वारीची काढणी सुरू असली तरी शिवारात ती जुनी गजबज नाही… ती साद नाही… तो ताल नाही… यंत्रांच्या घरघराटात आणि घाईच्या शेतीत मानवी आवाज हरवून गेला आहे. भलरी गाणारी पिढी कमी होत चालली आहे, तर नव्या पिढीला या परंपरेची ओळखही उरत नाहीये. भलरी ही केवळ श्रमगीतांची परंपरा नव्हती… ती ग्रामीण जीवनाचा आत्मा होती. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जपली गेलेली ही सांस्कृतिक शिदोरी आता काळाच्या पडद्याआड जात आहे.

यंदा ज्वारीचे क्षेत्र घटल्याने गरिबाची भाकरी महाग होणार आहे. बाजारात गतवर्षी उत्पादित ज्वारीचा भाव ५ हजार रुपये क्विंटल तर नवीन ज्वारीचा भाव ३५००-४००० प्रतिक्विंटल असून मंगळवेढा मालदंडी ज्वारीचा दर ५५०० रुपयांपर्यंत आहे. मंगळवेढा, सांगोला येथे ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे ज्वारीचा भाव वाढला आहे.

 

दरवर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारीचा पेरा कमी असून गहू, मका यासह इतर पिकांची लागवड वाढली आहे. ज्वारी पिकाला मेहनतीच्या मानाने मोबदला परवडत नाही, त्यामुळे ज्वारीचा पेरा दिवसेंदिवस कमी होत आहे. काढणीसाठी गावात मजूर मिळत नसल्याने घरच्या घरीच काढणी करावी लागणार आहे. लागवडीपेक्षा काढणीचा खर्च अधिक होतो. सुनील केदार, शेतकरी, खारवटवाडी सांगोला

 

ज्वारी, बाजरी, गहू काढताना आणि ऊसतोडणी करताना शारीरिक थकवा येतो, अशी कष्टाची कामे करताना थकवा जाणवू नये, श्रमपरिहार व्हावा, कापणी करताना उत्साह वाढावा, एकमेकांना स्फूर्ती मिळावी यासाठी समूहाने जी गाणी म्हटली जातात, त्या गीतांना ‘भलरी’ असे म्हणतात. या गीतांना कैक वर्षांची परंपरा आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही गाणी सतत हस्तांतरित होत जातात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!