सांगोला तालुका भाजप सरचिटणीसपदी सिद्धेश्वर गाडे यांची निवड

सांगोला तालुका भाजप सरचिटणीसपदी सिद्धेश्वर गाडे यांची निवड
सांगोला :(प्रतिनिधी): सांगोला तालुका च्या सरचिटणीसपदी अनुभवी व कार्यतत्पर कार्यकर्ते सिद्धेश्वर गाडे यांची निवड करण्यात आली आहे. तालुका पातळीवरील संघटना अधिक बळकट करण्यासाठी भाजपने अलीकडेच विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून, त्यामध्ये सिद्धेश्वर गाडे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सिद्धेश्वर गाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपशी निष्ठेने जोडलेले असून, तालुका स्तरावर संघटनात्मक कामात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. भाजपचे कार्यालयीन प्रमुख म्हणून त्यांनी पक्षाचे दैनंदिन कामकाज, कार्यकर्त्यांशी प्रभावी समन्वय तसेच विविध कार्यक्रमांचे नियोजन अत्यंत यशस्वीपणे पार पाडले आहे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे पक्षाची संघटनात्मक घडी अधिक मजबूत झाली आहे.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर बोलताना सिद्धेश्वर गाडे म्हणाले, “भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहे. यापुढे तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटना अधिक मजबूत करणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना पक्षात जोडणे, युवकांना संधी देणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, हा माझा प्रमुख उद्देश राहील.” तसेच बूथ पातळीवरील संघटना अधिक सक्षम करणे, महिला व युवक आघाड्यांचे कार्य अधिक सक्रिय करणे यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिद्धेश्वर गाडे यांच्या निवडीमुळे सांगोला तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक कामाला नवी ऊर्जा मिळेल आणि आगामी काळात पक्ष अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



