⚡ सत्तेच्या गणितावर चर्चा! जिल्हा परिषद–पंचायत समितीपूर्वी दिपकआबांचा ‘रणनिती फॉर्म्युला’ ⚡
जिल्हा परिषद–पंचायत समिती रणधुमाळीपूर्वी दिपकआबांची ‘रणनीती बैठक’

⚡ सत्तेच्या गणितावर चर्चा! जिल्हा परिषद–पंचायत समितीपूर्वी दिपकआबांचा ‘रणनिती फॉर्म्युला’ ⚡
जिल्हा परिषद–पंचायत समिती रणधुमाळीपूर्वी दिपकआबांची ‘रणनीती बैठक’
सांगोला (तालुका प्रतिनिधी): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याआधी माजी आमदार यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मंगळवार, दि. १६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहरातील आनंद लॉन्स येथे ही बैठक होणार असून, या बैठकीकडे सध्या संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील व मधुकर बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या सांगोला नगरपरिषद निवडणुकीचा सखोल आढावा, त्यातून पुढे आलेले धडे आणि आगामी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठीची पुढील राजकीय दिशा ठरवणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे ही बैठक केवळ संघटनात्मक नसून, राजकीयदृष्ट्याही निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
बैठकीत तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्यात येणार आहे. शेतीसाठी पाण्याची अपुरी उपलब्धता, दूध उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेल्या वाढीव अनुदानाची रक्कम, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची भरपाई, तसेच टेंभू योजनेतून बुद्धेहाळ तलाव आणि नीरा उजवा कालव्याच्या पाण्यातून चिंचोली तलाव वर्षातून किमान दोन वेळा भरण्याची मागणी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
याशिवाय टेंभू, म्हैसाळ व नीरा उजवा या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून सांगोला तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे, माण कोरडा व आफ्रुका नदीवरील बंधाऱ्यांची गळती थांबवून तातडीची दुरुस्ती, तसेच शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्यांवर उपाययोजना यावरही सखोल मंथन अपेक्षित आहे.
संघटनात्मक बांधणी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी, तसेच येत्या निवडणुकांतील संभाव्य रणनीती यावरही स्पष्ट दिशा दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नगरपरिषद निवडणुकीत दिपकआबांनी शेकाप व भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ते कोणती भूमिका घेतात, याबाबत तालुक्यात मोठी उत्सुकता आहे.
दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या या निर्णायक बैठकीस सांगोला शहर व तालुक्यातील दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील व मधुकर बनसोडे यांनी केले आहे.



