महाराष्ट्र

शरदचंद्रजी पवार: भारतीय राजकारणातील योद्धा!..महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य

 

शरदचंद्रजी पवार: भारतीय राजकारणातील योद्धा!

महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य

पूर्व‌ क्षितिजावर पहाटे लाली फुटावी, सूर्यकिरणांना पृथ्वीवर येण्याची घाई असावी. पण, मळभ भरलेले काही ढग अडथळे ठरावेत. त्यांना एखाद्या किरणाने निक्षून सांगावं की, ‘थांबा, मी येतोय. भु माईच्या पदरावर पडलेला तुमच्यामुळे निर्माण झालेला अंधार दूर करण्यासाठी.’ आणि खरोखरच एक किरण पेटून उठतो व्यवस्थेविरुद्ध, आईकडून समाजसेवेचे व्रत अन् नेतृत्वाचा गुण घेऊन. समाजकारण करता करता राजकारणात उतरतो. गल्ली, गाव, तालुका, जिल्हा, राज्य इतकेच नव्हे तर देशाच्या अर्थात दिल्लीच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरतो. संरक्षण मंत्री होतो. कृषी मंत्री होतो. कला, क्रीडा, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्राचं ज्ञान आत्मसात करतो. अभ्यासपूर्ण निर्णय घेतो. देशाच्या जडणघडणीची दिशा देणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा एक महत्त्वाचा अध्याय होऊन मार्गक्रमण करताना आयुष्याच्या सायंकाळी कार्यरुपी असंख्य किरणांचा स्रोत असलेलं हे व्यक्तिमत्त्व आप्तस्वकीयांनी उलगडलेला स्वतः:चा जीवनपट पाहते, ऐकते आणि आईच्या आठवणीने हळवे होते. एकच व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण आणि उत्तुंग कार्याचे पर्वत उभे करू शकते, याचे आदर्श उदाहरण म्हणजे शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब.

भारतीय राजकारण आणि समाजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब होय. शरद पवार साहेब म्हणजे भारतीय राजकारणातील एक योद्धा पुरुष म्हणून गणले जाते. देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासात शरद पवार साहेबांचे मोठे योगदान आहे. शरद पवार साहेबांचा 12 डिसेंबर रोजी 85 वा वाढदिवस आहे. मात्र, आज देखील तरुणाला मागे टाकेल, लाजवेल इतकी ऊर्जा त्यांच्याकडे आहे. ना कधी थकले, का कधी थांबले, असा अविरत प्रवास सुरु आहे. शरद पवार म्हणजे राजकारणातील एक वादळ आहे. जे आड आले त्यांना चारीमुंड्या चित करून टाकले. ज्यांनी साथ दिली त्यांना सोबत घेऊन देशाचा आणि राज्याच्या विकासाचा मार्ग निश्चित केला.

शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जाणता लोकनेता, द्रष्टा, संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे.याशिवाय महाराष्ट्र आणि देशाच्या साहित्य, संस्कृती, संगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार! कोणत्याही गोष्टीच्या मूळापर्यंत जाण्याची सवय आपला व्यासंग वाढवते, अभ्यासाची ओढ लावते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार! अभ्यास-सायास-प्रयास या गोष्टी व्यक्तिगत जीवन घडवीत असतात. शरद पवारांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वात हे सारे कंगोरे आढळून येतात.. कुशाग्र बुध्दिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा तीन महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेला एकमेव महानेता आजच्या भारतीय राजकारणात जर कोणी असेल तर तो म्हणजे एकमेव शरद पवार!

शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब 1978 ते 1980, 1988 ते 1991 व 1993 ते  1995 या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  1999 साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. पवार साहेबांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे. गोविंदराव हे निरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी होते. पुढे ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक झाले. शारदाबाई या 1938 मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या.

भारताच्या राजकीय क्षेत्रातील कर्तबगार, कणखर व कुशल नेतृत्व! तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे शरद पवार. 1956 साली ते शाळेत असताना शरदचंद्रजी पवार यांनी  गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले. पवार साहेबांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले. त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांमधील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार साहेब त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवार साहेबांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळा मार्गदर्शन केले. वयाच्या 24 व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. 1966 साली पवार साहेबांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली. त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.

शरद पवार ही भारतीय राजकारणातील अशी व्यक्ती जी नेहमी आपल्या राजकीय खेळीने भल्याभल्यांना हैराण करते.  राजकारणाशी त्यांचं असलेलं नातं अनेक दशकांपूर्वीचं आहे. ते अवघे 27 वर्षांचे असताना आमदार झाले होते. त्यांचा राजकीय अनुभव 50 वर्षांहून अधिक आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांचा पक्ष संपेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र शरद पवार नावाच्या अवलियाने गड केवळ राखलाच नाही तर तो जिंकलाही. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या शरद पवारांनी देशाच्या राजकारणात अशी जागा तयार केलीये, की आज ते कोणत्याही खेळीचा उलटफेर करू शकतात. शरद पवारांचा जन्म पुण्यातील बारामती येथे 12 डिसेंबर 1940 रोजी झाला होता. त्यांना राजकारणाचा वारसा मिळाला होता. शरद पवारांचे वडील गोविंदरकाव पवार आणि आई शारदाबाई भोसले दोघेही राजकारणात सक्रिय होते. यामुळे लहानपणापासून त्यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळत होतं. शरद पवार तीन दिवसांचे असताना त्यांची आई लोकल बोर्डाच्या बैठकीत त्यांना सोबत घेऊन गेली होती. शरद पवारांनी बीएमसी महाविद्यालयातून पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. अभ्यासापेक्षाही राजकारणात त्यांना अधिक आवड होती.

1960 पासून पवार राजकारणात सक्रिय…

1960 मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच काँग्रेससोबत काम करण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान काँग्रेसचे मोठे नेता केशवराज जेधे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या बारामती लोकसभेची जागा रिकामी झाली होती. या जागेसाठी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पीडब्ल्यूपी पार्टीने शरद पवारांच्या मोठ्या भावाला येथून तिकीट दिलं, तर याच जागेवरुन काँग्रेसने केशवराव यांच्या मुलाला उमेदवारी दिली होती. अशात त्यांच्या मोठ्या भावाने शरद पवारांना सांगितलं की, जर ते काँग्रेस सोबत असतील तर त्यांनी त्याच उमेदवाराचा प्रचार करायला हवा. त्यानुसार शरद पवारांनी स्वत:च्या भावाच्या विरोधात राहिलेल्या उमेदवाराचा प्रचार केला. यात त्या उमेदवाराचा विजयही झाला आणि शरद पवारांची सक्रिय राजकारणात एन्ट्री झाली.

वयाच्या 27 व्या वर्षी बनले आमदार..

काँग्रेसने 1967 मध्ये शरद पवारांना बारामती विधानसभेवरून तिकीट दिलं. 27 वर्षांचे पवार पहिल्यांदा बारामती जागेवरुन आमदार झाले. तेव्हापासून आतापर्यंत ही जागा पवारांकडेच राहिली आहे. 1991 पर्यंत शरद पवार या जागेवरुन आमदार होते. गेल्या पाच दशकात शरद पवारांनी 14 वेळा निवडणुकीत यश मिळवलं आहे. शरद पवार अवघ्या 38 वर्षांचे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ज्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यांच्याजवळ 180 आमदारांचं समर्थन होतं. तर विधानसभेच्या एकूण सदस्यांची संख्या 288 होती. 1978 पर्यंत इतक्या कमी वयात कोणताही नेता मुख्यमंत्री होऊ शकला नव्हता. 1998 मध्ये सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. याबाबत शरद पवार खूश नव्हते. यावेळी सोनिया गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवारी देण्यावरुन शरद पवारांनी विरोध केला. त्यांच्या या विरोधातून 20 मे 1999 मध्ये काँग्रेसने त्यांना पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी बडतर्फ केलं. या घटनेनंतर शरद पवारांनी आपल्या पार्टीची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठेवलं.

पहिली विधानसभा निवडणूक

सर्वप्रथम 1967 साली विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात वयाच्या 29 व्या वर्षी त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. 1972 आणि 1978 च्या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. 1978 साली वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली होती. त्यामुळे वसंतदादांचे सरकार पडले होते. 18 जूलै 1978 साली रोजी शरद पवारांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. 1984 साली शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पण, त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न जाता, राज्यातच राहण्याचा निर्णय घेतला. 1985 साली विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली. त्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 1987 साली शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला.1988 साली राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांची वर्णी लागली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप पक्षाने युती केल्याने राज्यात काँग्रेससमोर आव्हान निर्माण झाले होते. तरीही 1990 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी 4 मार्च 1990 रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.

राजीव गांधी यांच्या हत्त्येनंतर पंतप्रधानपदी नरसिंह राव विराजमान झाले. नरसिंहरावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांना संधी देण्यात आली. पण, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी 6 मार्च 1993 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली. पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द अनेक कारणांमुळे अत्यंत वादग्रस्त ठरली. 1995 मध्ये काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. 1996 साली शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि ते राष्ट्रीय राजकारणात उतरले. 1997 मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण तीत त्यांचा पराभव झाला. 1999 मध्ये त्यांनी इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली. या कारणासाठी काँग्रेस पक्षाने त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले होते.

10 जून 1999 रोजी शरद पवारांनी त्यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली. 1999 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. 2004 मध्ये राष्ट्रवादी केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला.  2004 मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. 2009 साली केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. 2014 मध्ये पवारांनी लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला होता. ते सध्या राज्यसभेवर खासदार आहे.

पवारसाहेबांचे सर्वांत मोठे वेगळेपण म्हणजे ते आपला मंत्रिपदाचा अधिकार आणि ज्ञान यांची अजिबात गल्लत करीत नाहीत. आपल्याकडे सत्तापद आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यासाठी जे ज्ञान लागते ते आपल्याकडे आहेच अशा भ्रमात अनेक राजकारणी असतात. परंतु पवारसाहेब याला अपवाद आहेत. त्यांचे वाचन चौफेर आहे. ते फक्त वाचनावर थांबत नाहीत. त्यातून ‘टिपणे’ तयार करून त्यावर मनन-चिंतन करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. या अभ्यास व व्यासंगाचा त्यांना वेगवेगळ्या स्तरांवरील नागरिकांमध्ये मिसळताना फार उपयोग होतो. शास्त्रज्ञ असो वा सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता असो वा एखादा खेळाडू वा कलावंत, व्यापारी असोत वा महिला वा आदिवासी या सर्वांमध्ये ते सहज रमतात परंतु त्यांपैकी प्रत्येकाकडून ते स्वत: काही ना काहीतरी शिकतातही.

पवारसाहेबांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अनेक सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय विचारधारांचे मनोज्ञ मिश्रण आहे. साहित्य-संस्कृतीची उत्तम जाण असलेला शरद पवारांसारखा नेता दुर्मीळच म्हणावा लागेल. साहित्य हा संस्कृतीचा आरसा असतो. आपल्या संस्कृतीची ओळख आपल्याला त्यातूनच होत असते. जुन्या-नव्या साहित्याच्या वाचनाने माणूस परंपरा व आधुनिकतेशी जोडलेला राहतो. पवारसाहेबांच्या अफाट वाचनामुळेच त्यांच्या मुळातल्या सकस व्यक्तिमत्त्वाला वैचारिक सुदृढतेची जोड मिळाली आहे. संगीताच्या आस्वादामुळे त्यांच्यातील रसिकपणातला ताजेपणा मिळत राहिलेला आहे आणि या जाणत्या आणि कृतिशील रसिकामुळे साहित्य-संगीत-क्रीडा आदी क्षेत्रांच्या विकासकार्यास हातभार लागत आलेला आहे. हळुवार अशी संवेदनशीलता लाभलेला शरद पवार हा संवेदनशील माणूस ‘लोकनेता’ होतानाही संवेदनशीलच राहिला किंबहुना ही अखंड जागती संवेदनशीलताच त्यांना ‘लोकनेता’ या उपाधीपर्यंत घेऊन गेली.

दुसऱ्याच्या दु:खाने माणूस म्हणून डोळ्यांत पाणी येणारा जेव्हा सांघिक पातळीवर ते पुसण्याचा कृतियुक्त यशस्वी प्रयत्न करतो तेव्हा तो लोकनेता म्हणून गणला जातो; आणि यातील सातत्य तो जेव्हा टिकवून ठेवतो तेव्हा तो ‘संवेदनशील लोकनेता’ म्हणून लोकांना आपला वाटतो. मनाची सर्जनशीलता नवनिर्मितीचा पाया ठरते. कल्पक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी हीच सर्जनशीलता उपयोगी पडते. इतरांना सुचू न शकणाऱ्या असंख्य हितकारक कृती-उपायांचा खजिना त्यांच्यातील सर्जनशीलता सतत लोकांसाठी खुला करीत असते. मग निमित्त कृषिविकासाचे असो, पाणी-समस्येचे असो, लढाई-दंगलीचे असो, साहित्य-संस्कृती विचारविनिमयाचे असो किंवा अन्य काही! जनसमूहाला समृध्दीच्या, भरभराटीच्या, विकासाच्या, उन्नतीच्या वाटा दाखविणारी आणि प्रचंड मोठ्या जनसमूहाला एकत्रितपणे त्या वाटेवरून घेऊन जाणारी प्रगाढ क्षमता शरद पवारांच्या सर्जनशील संवेदनशीलतेत आहे याचे प्रत्यंतर आपल्याला ठायी ठायी आलेले आहे. सध्याच्या सर्व नेतेमंडळींच्या मांदियाळीत पवारसाहेबांचे स्थान अपूर्व व अद्वितीय असे आहे. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रगतीची नेमकी दृष्टी असलेला एक प्रचंड अभ्यासू व सेवाभावी कार्यकर्ता दडलेला आहे. ते सदैव कालच्या अभियानास आजच्या कामाची जोड देऊन उद्याच्या भविष्याची मांडणी करीत असतात आणि यांतच त्यांचे सारे वेगळेपण दडलेले आहे.

पवार साहेब पुढच्या क्षणी काय करतील हे त्यांचे त्यांनाही ठाऊक नसेल. पण राजकारणात अत्यंत तरबेज असलेल्या या व्यक्तीला कुणी अंगाला तेल लावलेला पैलवान म्हटलं तर कुणी मैद्याचं पोतं. पण पवार साहेब अगदी सर्वांना पुरून उरले. अत्यंत व्यापक दृष्टी आणि महाराष्ट्राच्या हिताचे वेळोवेळी घेलेले निर्णय हा पवार साहेबांचा गुण असला तरी त्यांच्यावर कायमच टीका होत गेली. शरद पवार न बोलताही खूप काही बोलून जातात हे महाराष्ट्रातल्याच नाही तर केंद्रीय नेत्यांनाही ठाऊक आहे. शरद पवार ही भारतीय राजकारणातील अशी व्यक्ती जी नेहमी आपल्या राजकीय खेळीने भल्याभल्यांना हैराण करते. राजकारणाशी त्यांचं असलेलं नातं अनेक दशकांपूर्वीचं आहे. भारतीय राजकारण व समाजकारणातील एक सर्वमान्य जाणता लोकनेता! शेती, शिक्षण, व्यापार, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांतील प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सदैव देशातील सर्वसामान्य माणसाच्या हिताची तळमळ बाळगणार्‍या या समर्थ नेतृत्वाच्या वाटचालीचा मागोवा घेत त्याच्या विचारांतून सामान्य कार्यकर्त्यांपासून ते देशाच्या
विकासाची आस बाळगणार्‍या जागरुक नागरिकांपर्यंत प्रत्येकाला प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!