राजकीय

“दोन तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या… पुढील पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ!”

“दोन तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या… पुढील पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ!”

सांगोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विकासाच्या आश्वासनांनी गाजली सभा

सांगोला (प्रतिनिधी): लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार हा लोक उत्सव आहे. सांगोल्याचा सर्वांगीण विकास होणं हेच आमचं प्राधान्य. सांगोला शहराचा विकास आराखडा तयार करा, आम्ही शब्द दिला की पूर्ण करतो. २४ तास स्वच्छ पाणी, घनकचरा व्यवस्थापन, धुळमुक्त काँक्रीट रस्ते, आरोग्य सुविधा, माजी सैनिकांसाठी भवन, स्मारकांची उभारणी यासाठी आवश्यक निधी सरकारकडून उपलब्ध करून दिला जाईल. “दोन तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या… पुढील पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही,” असा जाहीर भरोसा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगोल्यातील वातावरणाला जोरदार राजकीय ऊर्जा दिली.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने माहोल तापला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीने निवडणुकीची हवा आणखी जोर धरू लागली. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे सांगोल्यातील राजकीय समीकरणांना नवीन रंग चढल्याचे स्पष्ट झाले.

यावेळी व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्यासह शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या ३०० कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या मालिकेत सांगोल्याचाही समावेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावांसोबत शहराचाही विकास तितकाच महत्त्वाचा आहे. सांगोल्याचा विकास आराखडा तयार करा. २४ तास स्वच्छ पाणी, घनकचरा व्यवस्थापन, धुळमुक्त काँक्रिट रस्ते, माजी सैनिकांसाठी भवन, महापुरुषांची स्मारके, आरोग्यविषयक सुविधा यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्यात ३०० शहरांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू आहेत; सांगोलाही त्याचा लाभ मिळेल.  गावांसह शहराचा विकास महत्वाचा आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्यातील शहरांचा विकास होत आहे. निवडणुका येत असतात जात असतात मी टीका-टिप्पणी करणार नाही. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोकळेपणाने जनतेशी संवाद साधत सांगोल्यासाठी मोठा विकास रोडमॅप जाहीर केला. “दोन तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या… पुढील पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही,” या त्यांच्या वाक्याने उपस्थित जनतेत उत्साह निर्माण केला.

यावेळी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, सांगोला नगरपालिकेची निवडणूक पुनर्वसनाची नव्हे, विकासाची आहे. शहाजीबापू सतत अन्याय होत असल्याचे सांगतात; पण एकत्र लढण्याच्या चर्चेनंतरही त्यांनी थेट नगराध्यक्ष उमेदवार जाहीर केला. शहर विकासासाठी मोठा निधी आला, मात्र कामे झाली नाहीत. शहरात टक्केवारीचाच मुद्दा चर्चेत आहे. ही निवडणूक कोणाचे पुनर्वसन करण्यासाठी नसून विकासासाठी आहे असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, “पहिल्यांदाच शेकाप–दीपक आबा गट–भाजप एकत्र आले आहेत. काहींच्या हट्टामुळे शहर विकासाची संधी हुकली. सांगोल्यात एमआयडीसी मंजूर व्हावी, कब्रस्तानासाठी वाढीव जागा, डंपिंग ग्राउंड गावाबाहेर जावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेकाप कार्यकर्त्यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सध्या विविध सभेंमधून फोनवर एमआयडीसी मंजूर केल्या जात असल्याने पाहिले आहे. सांगोला शहराच्या विकासासाठी सांगोल्यात मोठी एमआयडीसी मंजूर करावी अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली.

प्रास्ताविक करताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी शहाजीबापूंवर थेट टीका करताना म्हणाले की, “शहाजीबापू स्वतःला राजे समजतात, दोन वेळा निवडून दिलं तरी टीका करतात. मी मुंबईला पाठवू शकतो तसे घरी बसवूही शकतो. पण सांगोल्यात जिकडे दीपकआबा तिकडे गुलाल असतो. तालुक्याला कोण खरं-खोटं बोलतो हे चांगलंच माहित आहे. नगरविकास खात्यावर त्यांचा जोर असला तरी आमच्याकडे सर्व खात्याचे ‘हेडमास्तर’ आहेत हे त्यांनी विसरू नये.”  सांगोल्यात कमळ फुलवण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

निवडणुकीत ‘विकासाचा’ मुद्दा केंद्रस्थानी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेने सांगोल्यातील निवडणूक अधिक रंगतदार झाली असून विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी येत आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानात सांगोला शहरातील मतदार भाजप–शेकाप–दीपक आबा गटाला विश्वास देतील की शिवसेनेला संधी देतील? याकडे जिल्ह्याबरोबर राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!