ऐतिहासिक सांगोला नगरपालिकेला १७० वर्षाचा इतिहास..!
४५ वर्षात २८ जणांनी भूषवले नगराध्यक्षपद, क वर्गातील सर्वात जुनी नगरपालिका

ऐतिहासिक सांगोला नगरपालिकेला १७० वर्षाचा इतिहास..!
४५ वर्षात २८ जणांनी भूषवले नगराध्यक्षपद, क वर्गातील सर्वात जुनी नगरपालिका
सांगोला (दिलीप घुले): १८५० च्या कायद्याने भारतात नगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार मिळाल्यानंतर नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. १८५० नंतर भारतातील अनेक शहरांसह पुणे, सोलापुर, सांगोला, सांगली, ठाणे, नाशिक, बार्शी, सातारा, कोल्हापूर, मंगळवेढा, वाई अशा अनेक नगरपालिका अस्तित्वात आल्या असून या नगरपालिकांनी शंभरी ओलांडली आहे. १० जानेवारी १८५५ साली स्थापन झालेल्या सांगोला नगरपालिकेला १७० वर्षाचा इतिहास असून ही क वर्गातील सर्वात जुनी नगरपालिका आहे. पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ऍड.पृथ्वीराज चव्हाण यांनी सन १९७४ ते १९८५ पर्यंत लोकाभिमुख काम केले. १९७७ पासून ४५ वर्षात २८ जणांनी नगरपलिकेचे नगराध्यक्षपद भूषवले आहे. आज १० जानेवारी रोजी सांगोला १६९ वर्षे पूर्ण झाली आहेत.
भारतात नगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार मिळाल्यानंतर १८५० च्या कायद्याने पुणे, सोलापुर, सांगोला, सांगली, ठाणे, नाशिक, बार्शी, सातारा, कोल्हापूर, मंगळवेढा, वाई अशा अनेक नगरपालिका अस्तित्वात आल्या. त्या काळात नगरपालिका स्थापन झाल्यानंतर तत्कालीन गव्हर्नर नऊ ते पंधरा जणांची म्युनिसिपल कमिशनर म्हणून नियुकी करीत असे. वेगवेगळ्या जाती-धर्मातील प्रतिष्ठित नागरिकांना प्रातिनिधिक पंच म्हणून नेमणूक केली जात असे. जिल्हाधिकारी अध्यक्ष होते. कामकाज नियम प्रत्येक नगरपालिकेने बनवायचे आणि गव्हर्नरांनी मंजूर केल्यानंतर अंमलात आणायचे अशी त्यावेळी प्रथा होती. घरपट्टी व जकात हे कर बसविण्याचा नगरपालिकेला अधिकार होता. रस्ते, सफाई, पाणीपुरवठा वगैरे कामे आवश्यक मानली होती. सोलापूर नगरपालिकेचे १८५२-५३ चे पहिले अंदाजपत्रक तीस हजार रुपयांचे होते. उल्लेखनीय कामे पार पाडूनही त्यापैकी काही रकम शिल्लक राहिली म्हणून लोकांनी नगरपालिकेला सुधारणी हे नाव बहाल केले.
प्रतिष्ठित नागरिकांना नगरपालिकेच्या कामात लक्ष देण्यास वेळ कमी मिळत असल्याचे पाहून प्रिन्सिपल सदर, अमीन, डेप्यूटी डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट यांची नगरपालिकेवर नेमणूक करण्यात येऊ लागली. जिल्हाधिकारी ऐवजी बिनसरकारी सभासदांना अध्यक्ष करण्याची प्रथा १८८५ सालापासून सुरू झाली. छोट्या शहरातही नगरपालिका स्थापन करण्यात याव्यात यासाठी तरतूद करणारा बॉम्बे डिस्ट्रिक्ट म्युनिसिपालिटी ॲक्ट १९६१ साली करण्यात आला. १९१८-१९ च्या माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणेनुसार नगरपालिकामध्ये निवडणुकीचे तत्व स्वीकारले गेले. मतदानाचा अधिकार विशिष्ट रकमेपेक्षा अधिक घरभाडे किंवा शेतसारा भरणाऱ्याला, आयकर भरणाऱ्याला देण्यात आला, मोठ्या शहरातील नगरपालिका यासाठी सुधारलेला कायदा १९२५ साली बॉम्बे युनिसीपल बरोज ॲक्ट या नावाने करण्यात आला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रौढ मताधिकाराचे तत्व नगरपालिका निवडणुकीत स्वीकारले गेले. पश्चिम महाराष्ट्रात बॉम्बे डिस्ट्रिक्ट ॲक्ट १९०१ व बॉम्बे मुन्सिपल बरोज ॲक्ट १९२५. विदर्भात सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार ॲक्ट १९२२ तर मराठवाडयात हैदराबाद म्युनिसीपॉलीटीज ॲक्ट १९५६ लागू होता. या कायद्यांचे एकत्रीकरण करणे आणि इतरही काही सुधारणा याबाबत अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी १९६३ साली तत्कालीन नगरविकास मंत्री डॉ.रफिक झकेरिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अहवालातील मुख्य शिफारशी स्वीकारून महाराष्ट्र सरकारने १९६५ साली महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम हा कायदा करून घेतला. त्याची अंमलबजावणी जून १९६७ पासून सुरू झाली. १८६५ च्या कायद्यानुसार १५ हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी नगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला देण्यात आला. १९७० साली महाराष्ट्रात नगरपालिकांची संख्या पुढीलप्रमाणे होती अ वर्ग २१, ब वर्ग ४५, क वर्ग १४९ आणि थंड हवेच्या ठिकाणच्या सहा एकूण २२१ नगरपालिका अस्तित्वात होत्या.
१९७० सालानंतर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सांगोला नगरपरिषदेचे अध्यक्षपद भूषविलेल्या नगराध्यक्षांकी नावे पुढीलप्रमाणे पृथ्वीराज भिमराव चव्हाण १ एप्रिल १९७७ ते २८ मे १९८५, मारुती बनकर २८ मे १९८५ ते १६ ऑगस्ट १९८६, कृष्णाथ मन्मथ लोखंडे २३ सप्टेंबर १९८६ ते १८ दिसंबर १९८८, भाऊसाहेब बिले १८ डिसेंबर १९८८ ते १५ मार्च १९८९, पी.सी. झपके ४ एप्रिल १९८९ ते ३० जून १९९०, दिनानाथ लोखंडे २६ जुलै १९९० ते २० फेब्रुवारी १९९१, गोविंद जाधव २६ फेब्रुवारी १९९१ ते १७ डिसेंबर १९९१, प्रभाकर माळी १७ डिसेंबर १९९१ ते ११ मार्च १९९३, जालिंदर ढेरे ३ एप्रिल १९९३ ते २४ मे १९१४, श्रीकांत भोसेकर २४ मे १९९४ ते १२ जानेवारी १९९६, लक्ष्मण भाकरे १२ जानेवारी १९९६ ते १७ डिसेंबर १९९६, रामचंद्र साळे १७ डिसेंबर १९९६ ते १७ डिसेंबर १९९७, बजरंग केदार १७ डिसेंबर १९९७ ते डिसेंबर १९९८, रफीक तांबोळी १७ डिसेंबर १९९८ ते ११ जानेवारी २०००, भिमराव राऊत १२ जानेवारी २००० ते २९ एप्रिल २०००, गोविंद जाधव २९ एप्रिल २००० ते ११ सप्टेंबर २००१, छाया पाटील २४ डिसेंबर २००१ ते २५ फेब्रुवारी २००४, शकुंतला केदार १३ डिसेंबर २००४ ते २० डिसेंबर २००६, अनिल खडतरे २० डिसेंबर २००६ ते १९ जून २००९, रफीक नदाफ १९ जून २००९ ते २२ ऑक्टोंबर २०११, मारुती बनकर ३० डिसेंबर २०११ ते २५ एप्रिल २०१३. प्रतिभा सपाटे २५ एप्रिल २०१३ ते १४ मार्च २०१४, इमाम मणेरी १४ मार्च २०१४ ते २१ जुलै २०१४, नवनाथ पवार २१ जुलै २०१४ ते १९ नोव्हेंबर २०१४, सुहास होनराव १९ नोव्हेंबर २०१४ ते १० फेब्रुवारी २०१५, अरुणा इंगोले १० फेब्रुवारी २०१५ ते ८ जून २०१६, मधुकर कांबळे ८ जून २०१६ ते ३० डिसेंबर २०१६, राणी माने ३० डिसेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०२१. त्यानंतर अनेक कारणांमुळे नगरपालिक निवडणुका प्रलंबित होत्या. नगरपालिकेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला असल्याने जानेवारी २०२२ पासून नगरपालिकेवर प्रशासक आहे. सध्या सांगोला नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.



